Sada Sarvankar On Amit Thackeray: उमेदवारी अर्ज भरताना कुणकुण लागली; सदा सरवणकरांचा 'गनिमी कावा'; संपूर्ण रणनीती सांगितली!
Sada Sarvankar On Amit Thackeray: 'एबीपी माझा'शी बोलताना सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरतानावेळीचा 'गनिमी कावा'ची देखील रणनिती सांगितली.
Sada Sarvankar On Amit Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी मनधरणी करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरु आहेत. सदा सरवणकर यांना विधानपरिषद आणि मंत्री पद देऊन सन्मान करण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. माहीम विधानसभेतून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरेंसाठी (Amit Thackeray) महायुतीकडून सदा सरवणकर यांना हा प्रस्ताव देण्यात आला आहे. याबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याची भूमिका सदा सरवणकर यांनी स्पष्ट केली. तसेच 'एबीपी माझा'शी बोलताना सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरतानावेळीचा 'गनिमी कावा'ची देखील रणनीती सांगितली.
सदा सरवणकरांचा 'गनिमी कावा'-
माझ्यावर किती दबाव आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी कोणाचाही फोन आला तर माघार घेणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं आहे. कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घ्या...नागरिकांचे मत आहे माघार घ्यायची नाही. माझी लढाई प्रचंड मोठ्या शक्तीची आहे, असं सदा सरवणकर म्हणाले. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना सदा सरवणकरांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यावर बोलताना सदा सरवणकरांनी सांगितले की, 1 वाजता निघालात तर 3 वाजता अर्ज भरण्यासाठी पोहचू शकणार नाही, याची कुणकुण होती. कोणीही काहीही केलं असतं तर नक्कीच मी अर्ज दाखल करण्यासाठी पोहचू शकलो नसतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना गनिमी कावा हा एक रणनितीचाच भाग होता, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.
मी त्याग करण्यासाठी तयार आहे- सदा सरवणकर
शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आलेल्या समस्त दादरकरांचे मी आभारी आहे. त्यांचे मत आणि माझे मत वेगळे नाही. मनसेने काही उमेदवार आमच्या विरोधातले मागे घ्यावे, त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून विचार करणार आहे. मनसेच्या काही उमेदवारांचा फटका आम्हालाही बसू शकतो. मी माघार घेतल्याचा अमित ठाकरेंना किती टक्का फायदा होईल माहिती नाही. आम्ही मनसेसोबतही संघर्ष केलेला आहे. मुंबईतले सगळे मनसेचे उमेदवार मागे घेत असतील तर मी देखील दोन पाऊल मागे घेईन. शेवटी महायुतीचं सरकार येण्यासाठी मी त्याग करण्यासाठी तयार आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.