Sada Sarvankar On Amit Thackeray: मी माघार तेव्हाच घेईन, जेव्हा मनसे महायुतीविरोधातील सर्व उमेदवार मागे घेईल, सदा सरवणकरांची अट!
Sada Sarvankar On Amit Thackeray: सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर आज भूमिका स्पष्ट केली.
Sada Sarvankar On Amit Thackeray: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याचदरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि विद्यामान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर आज भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ही आमची इच्छा आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत. मुंबईत महायुतीविरोधात मनसेने काही उमेदवार उभे केले आहेत. माहीम विधानसभेतून मी माघार घेतली तर मनसे महायुतीविरोधातील माघारी घ्यायला तयार आहे. यावर तुझं काय म्हणणं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी मला विचारले. मी एकट्यासाठी निवडणूक लढवत नव्हतो. शिंदे साहेब म्हणाले की, मला कार्यकर्त्यांना नाराज करायचे नाही. तू तुझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलून घे. महायुतीविरोधातील उमेदवार मनसे मागे घेत असेल, आमचे आमदार वाढणार असतील, तर माहीममध्ये अडून राहणे सयुक्तिक नाही. आता मी प्रचारात असलेल्या माझ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बोलावून घेतले आहे. त्यांच्याशी चर्चा करुन मी पुढील निर्णय घेईन, असे सदा सरवणकर यांनी म्हटले. सदा सरवणकर यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता ते माहीममधून माघार घेण्याची दाट शक्यता आहे. महायुतीच्या भल्यासाठी आपण माघार घ्यायची की नाही, याबाबत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.
अमित ठाकरेंना किती टक्का फायदा होईल माहिती नाही- सदा सरवणकर
शिवसेना भवन येथे बॅनर लावण्यात आलेल्या समस्त दादरकरांचे मी आभारी आहे. त्यांचे मत आणि माझे मत वेगळे नाही. मनसेने काही उमेदवार आमच्या विरोधातले मागे घ्यावे, त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोलून विचार करणार आहे. मनसेच्या काही उमेदवारांचा फटका आम्हालाही बसू शकतो. मी माघार घेतल्याचा अमित ठाकरेंना किती टक्का फायदा होईल माहिती नाही. आम्ही मनसेसोबतही संघर्ष केलेला आहे. मुंबईतले सगळे मनसेचे उमेदवार मागे घेत असतील तर मी देखील दोन पाऊल मागे घेईन. शेवटी महायुतीचं सरकार येण्यासाठी मी त्याग करण्यासाठी तयार आहे, असं सदा सरवणकर यांनी सांगितले.