Amit Thackeray: मातोश्रीवर गेल्यावर आजा मला म्हणायचा, काय रे आलास का ब्रुस ली; अमित ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण
Amit Thackeray & Balasaheb Thackeray: अमित ठाकरे यांनी त्यांच्यावर सगळ्यात जास्त त्यांच्या वडिलांचा प्रभाव असल्याचे सांगितले. मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो, असेही म्हटले.

Amit Thackeray & Balasaheb Thackeray: माझे आजोबा काय होते, हे मला खूप उशीरा कळायला लागलं. मी लहानपणी मातोश्रीवर जायचो. त्यावेळी आजा (बाळासाहेब ठाकरे) माझ्याशी बोलायचा. तेव्हा मातोश्रीवर कोणतेही राजकीय वातावरण नसायचे. तेव्हा मी आदित्यकडेही खूपदा जायचो, अशी आठवण अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सांगितले. ते बुधवारी एबीपीच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अमित ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balsaheb Thackeray) यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या. (BMC Election 2026)
मी लहानपणी मातोश्रीवर खूपदा जायचो. त्यावेळी मीना ताईही मातोश्रीवर असायच्या. त्या गेल्या तेव्हा मी तीन-चार वर्षांचा होतो. मी लहान असताना माझे डोळे बारीक होते. त्यामुळे आजा मला ब्रुस ली बोलायचा. मी मातोश्रीवर गेलो की, आलास का रे ब्रुस ली, असे ते विचारायचे. मी तेव्हा आदित्यकडेही खूप जात होतो. पहिलीत असताना आदित्यकडेच मी बॅटमॅनचा चित्रपट पाहिला होता. पण नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर हे सगळे बंद झाले, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
अमित ठाकरे यांनी 'माझा कट्टा'वर बोलताना राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला खूप उशीर झाला, हा दावा फेटाळून लावला. गेला काही वर्षे आमच्यात मतभेद होते. मात्र, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन आम्हाला एकत्र यावेसे वाटले. शिवसेना आणि मनसेला एकत्र यायला उशीर झाल्याचे मला वाटत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आणि नशीब असते. तेव्हाच ती गोष्ट होते, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
Amit Thackeray: मनसेला उतरती कळा लागल्यावर वडिलांना एकटं पडून द्यायचं नव्हतं: अमित ठाकरे
माझ्या वडिलांनी कष्ट करुन मनसे पक्ष स्थापन केला. मनसेचे 13 आमदार निवडून आले होते, अनेक नगरसेवक निवडून आले. नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता आली, आम्ही चांगल्याप्रकारे काम केले. पण 2014 नंतर मनसेचा उतरता काळ सुरु झाला. तेव्हा मला वाटलं की, मला आता राजकारणात आले पाहिजे. कारण माझे वडील एकटे पडायला नको. पक्षाच्या चढत्या काळात येण्यात काही अर्थ नव्हता. उतरत्या काळात माझी वडिलांना जितकी मदत होईल, तितकी करायची होती. मला राजकारणात कोणताही रस नव्हता. पण मला बाबांना काहीतरी मदत करायची होती. त्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे काम केल्यानंतर मला राजसाहेबांनी पक्षात पद दिले, असे अमित ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे घराण्याच्या संपत्तीबाबतही अनेकजण टीका करतात. मात्र, गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही सत्तेत नाही. आम्ही आमच्या व्यवसायातून हा पैसा कमावला आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
आणखी वाचा
आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले; म्हणाले, 'तुमच्या घरातल्या व्यक्तीला...'
अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना तो प्रश्न अन् दुसऱ्याच दिवशी काकांकडून पुतण्याला गिफ्ट; नेमकं काय घडलं?




















