Amit Thackeray: तुम्हाला लाज वाटली पाहिजे, 365 दिवस उपलब्ध असूनही...; सदा सरवणकरांवर अमित ठाकरेंचा घणाघात
Amit Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवासांपासून कायम चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे माहीममधून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. याचदरम्यान अमित ठाकरेंनी मावळते आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
माझ्याविरोधात जे विरोधी उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारामधील महत्वाचा मुद्दा नळाला पाणी देणे हा आहे. आता 2024 मध्ये जर नळाला पाणी देऊ हा प्रचाराचा मुद्दा असेल तर तुम्हाला कुठेतरी लाज वाटली पाहिजे, याचा अर्थ कोणालातरी मागची पाच वर्ष पाणी मिळालं नाही असा होतो. मी कोळी बांधवांच्या वसाहतीत गेल्यावर तिथे समजलं की, त्यांना पाणी नसल्यामुळे दिवाळीची पहिली आंघोळ पण करता नाही आली, यापेक्षा अजून लज्जास्पद काय असू शकेल?, असा सवाल अमित ठाकरेंनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.
तुम्ही 365 दिवस लोकांच्या संपर्कात राहून नक्की काय केलं?- अमित ठाकरेंचा सवाल
मावळते आमदार 365 दिवस लोकांसाठी उपलब्ध होते, तरीसुद्धा जर अशी परिस्थिती असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. शिवाजी पार्क मैदानाची परिस्थिती बघा, समुद्र किनाऱ्याची परिस्थिती बघा...हे सर्व जाऊदेत पण जर कोणाच्या नळाला पाणी येत नसेल तर तुम्ही 365 दिवस लोकांच्या संपर्कात राहून नक्की काय केलं?, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला. मी निवडून आल्यावर माहीम प्रभादेवी आणि दादर अशा तीन ठिकाणी शाखा उघडणार आहे, जिथे त्या विभागातले लोक मला येऊन भेटू शकतात. माझी उपलब्धता ही कायम असणार आहे. हे सर्व बोलण्यापेक्षा मी निवडून आल्यावर नक्कीच सिद्ध करून दाखवेन, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय- अमित ठाकरे
सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे तुम्ही आता माहीमधील तिरंगी लढतीकडे कसे पाहता?, असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच मला अजिबात आव्हान वाटत नाही, असंही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
मनसेचा अनोखा फंडा; इंजिन तयार करत प्रचार, Video:
संबंधित बातमी:
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!