एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युती न झाल्यास अंबरनाथची लढत होणार लक्षवेधी.. शिवसेनेची डोकेदुखी वाढणार!
मुंबई शेजारचं मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेलं शहर म्हणजे अंबरनाथ. देशभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक कंपन्या या अंबरनाथच्याच. कंपन्या आहेत म्हणून कामगाराचं शहर ही अंबरनाथची ओळख, एकेकाळी शिवसेनेचे एकमेव मुस्लीम नेते असलेल्या साबीर शेख यांचा हा मतदारसंघ. मतदारसंघ फेररचनेनंतर राखीव झालेला हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेचा गड बनलाय.
अंबरनाथ शहर हे कामगार वस्तीचं शहर म्हणून ओळखलं जातं. याचं कारण म्हणजे अंबरनाथ शहरात पूर्वीपासून असलेल्या बड्या कंपन्या. शहरात विम्को ही आगपेटीची कंपनी, धरमसी मोरारजी केमिकल अर्थात डीएमसी ही खत कंपनी, स्वस्तिक, गार्लिक कंपन्या, ऑर्डनन्स फॅक्टरी सोबतच शहराच्या तिन्ही बाजूंना असलेली एमआयडीसी आणि त्यातील जवळपास एक हजार कंपन्या असे मोठे उद्योग अंबरनाथ शहरात आहेत. या कंपन्यांच्या कामगारांनी अंबरनाथमध्ये आपापल्या वसाहती तयार केल्या आणि म्हणूनच आज अंबरनाथ शहरात कामगारवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात शहराच्या सीमा विस्तारू लागल्या असून अंबरनाथ कुठे संपलं आणि बदलापूर कुठे सुरू झालं, हेदेखील हल्ली कळून येत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन लोकवस्ती शहरात तयार झाली आहे. मात्र या वाढीव लोकवस्तीला पुरेशा सुविधा पुरवता पुरवता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन प्रशासनाच्या तोंडचं पाणी अक्षरशः पळालं आहे.
अंबरनाथ शहर हे काही वर्षांपूर्वी अतिशय खराब रस्त्यांसाठी ओळखलं जात होतं. मात्र मागील आठ दहा वर्षात शहरातील गल्लोगल्ल्लीत सिमेंट कॉंक्रीटचे पक्के रस्ते झाले आहेत. मात्र एकीकडे गल्ल्या सुधारल्या असल्या, तरी महामार्ग मात्र अजूनही अपूर्णावस्थेतच असल्याचं पाहायला मिळतं. कारण एमएमआरडीएकडून केलं जाणारं कल्याण बदलापूर कर्जत राज्यमार्गाचं काम असो, किंवा अंबरनाथ स्टेशन ते लोकनगरी, एमआयडीसी रस्त्याचं काम असो, ही महत्त्वाची कामं आज अपूर्ण अवस्थेत रखडली आहेत. शिवाय ही कामं करताना भविष्याचा विचार करून योग्य ठिकाणी रस्त्याचं प्रस्तावित रुंदीकरण करणं गरजेचं असताना अनेक ठिकाणी रस्ता चिंचोळा करण्यात आला आहे.
शहराला लागून असलेल्या अनधिकृत डम्पिंग ग्राउंडचा विषयही गेल्या काही वर्षात गंभीर बनत चालला आहे. एकीकडे याच भागात लोकवस्ती वाढत असताना डम्पिंगच्या धुरामुळे मात्र अक्षरशः नागरिकांचा श्वास कोंडू लागला आहे. दुर्दैवाने यावर अजूनही ठोस उपाय सापडू शकलेला नाही. शहरात भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजना ही कामे मार्गी लागली आहेत. तसेच सूर्योदय सोसायटीचा शासनदरबारी प्रलंबित असलेला प्रश्नही सुटत आला आहे. मात्र ठोस विकासकामांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास शेजारील मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा गेल्या 10 वर्षात ज्या गतीने कायापालट झाला, त्या तुलनेत अंबरनाथ विधानसभेत मात्र फक्त भूमीपूजनेच झाली.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. 1990, 1995, आणि 1999 साली या मतदारसंघातून शिवसेनेचे साबीर शेख निवडून आले होते. त्यानंतर 2004 साली राष्ट्रवादीच्या किसन कथोरे यांनी साबीर शेख यांचा पराभव केला. तर 2009 साली अंबरनाथ मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला. त्यावेळी शहरातले नामांकीत दंतचिकित्सक डॉ. बालाजी किणीकर यांना शिवसेनेत घेऊन युतीतर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेश तपासे आणि किणीकर यांच्यात प्रमुख लढत झाली, ज्यात किणीकर यांचा 20 हजार मतांनी विजय झाला. त्यानंतर 2014 सालची निवडणूक मात्र शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली. कारण युती तुटल्याने भाजपने अंबरनाथमध्ये उमेदवार दिला आणि निवडणूक जिंकता जिंकता सेनेला अक्षरशः घाम फुटला. कारण शिवसेनेचा विजय झाला असला, अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेचं मताधिक्य 90 टक्क्यांनी घटून अवघ्या दोन हजारांवर आलं. याला काही प्रमाणात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीही कारणीभूत असल्याचं बोललं जातं.
आता 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेतर्फे बालाजी किणीकर हेच उमेदवार असतील, हे स्पष्ट आहे. मात्र यंदा शिवसेनेत इतरही काही इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवाय युती जरी झाली तरी हा मतदारसंघ आता आम्हाला द्यावा, अशी मागणी करत भाजपनेही अंबरनाथमधून तयारी सुरू केली आहे. भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी आहे. सध्या सुमेध भवार यांचं नाव या गर्दीत आघाडीवर आहे. आयआयटी मुंबईतून उच्चशिक्षण घेतलेले सुमेध भवार हे उद्योजक असून त्यांच्यात आणि बालाजी किणीकर यांच्यात लढत झाल्यास उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये सामना रंगू शकतो. त्यामुळे युती होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस हेदेखील यंदा तयारीत असून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पुन्हा एकदा महेश तपासे इच्छुक असून वंचित बहुजन आघाडीतर्फे धनंजय सुर्वे इच्छुक आहेत. तर कॉंग्रेसमध्येही यंदा बरेच इच्छुक आहेत. आत्तापर्यंत राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ यंदा जागावाटपात आम्हाला मिळावा, अशी कॉंग्रेसची इच्छा आहे. त्यासाठी रोहित साळवे, कमलाकर सूर्यवंशी, संघजा मेश्राम, अनिता जाधव असे अनेक इच्छुक आहेत. यापैकी कुणाला उमेदवारी मिळते, आणि कुणामध्ये प्रमुख लढत होते, हे जाणून घेण्यासाठी मात्र काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement