Maharashtra Government Formation | भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपली
LIVE
Background
मुंबई : मुंबईत सोमवारी (11 नोव्हेंबर) घडलेल्या वेगवान आणि नाट्यमट्य घडामोडीनंतर आज राज्यातील जनतेसमोर काय वाढून ठेवलंय हा प्रश्न आहे. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेना सत्ता स्थापन करु शकली नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आज सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल करणार हे पाहावं लागेल. आज कोणत्या घडामोडी घडणार यावर नजर टाकूया.
शिवसेनेची मातोश्री आणि हॉटेल रिट्रीटवर बैठक
पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे आणि राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. परंतु यानंतर रात्री अनेक घडामोडी घडल्या. शिवसेना नेते राजभवनावरुन थेट मातोश्रीवर गेले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पुढची भूमिका ठरवण्यासाठी ‘मातोश्री’वर दोन तास बैठक चालली. यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सचिन अहिर, आदेश बांदेकर उपस्थित होते. इथली बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदे, रामदास कदम रात्री हॉटेल रिट्रीटमध्ये पोहोचले आणि शिवसेना आमदारांशी पुन्हा एकदा चर्चा केली.
राष्ट्रवादीची आज पुन्हा बैठक
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीची आज सकाळी 11 वाजता काँग्रेससोबत बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीची सत्ता स्थापन करण्याबाबतची भूमिका स्पष्ट होईल. सत्ता स्थापन करण्यासाठी तीन पक्ष एकत्र येणं आवश्यक असल्याने, ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी आपली भूमिका शिवसेनेसमोर मांडेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.
काँग्रेसचे बडे नेते शरद पवारांना भेटणार
राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल हे काँग्रेसचे बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत सत्ता स्थापनेसंदर्भातील निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपचं वेट अॅण्ड वॉचचं धोरण
भाजपच्या कोअर कमिटीची काल दिवसभरात दोन वेळा बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपने आता वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली जाणार नाही, असं सांगण्यात येत आहे.
संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी
शिवसेनेची धडाडती तोफ अर्थात संजय राऊत यांची लीलावती रुग्णलयात अँजिओप्लास्टी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतील.
संबंधित बातम्या