सत्तास्थापनेसाठी भाजप, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून निमंत्रण
भाजपच्या नकारानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काल निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. काँग्रेसने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेची कोंडी झाली.
मुंबई : शिवसेना राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने सत्ता स्थापन करु शकलेली नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. रात्री 8.30 वाजता राजभवनातून फोन आला. राज्यपालांनी भेटायला बोलावलं असल्याने आम्ही राजभवनाकडे निघालो आहोत, असं अजित पवार यांनी सांगितलं. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे उद्या रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे.
विधानसभा निवडणुकीत 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्षांच्या पाठिंब्यासह भाजपचं संख्याबळ 118 वर पोहोचलं होतं. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं होते. मात्र शिवसेनेशिवाय पुरेसं संख्याबळ नसल्याने भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दर्शवली.
भाजपच्या नकारानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी काल निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आज दिवसभर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. काँग्रेसने तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेची कोंडी झाली. सत्तास्थापना करण्यासाठी आम्ही दावा केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी आम्हाला किमान दोन दिवसांचा वेळ गरजेचा आहे. यासाठी आम्ही राज्यपालांकडे वेळ मागितला होता, मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरीही पाठिंब्याचं पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं नाही. राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नाही. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. शिवसेना दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही.
राष्ट्रवादी उद्या काँग्रेस आणि इतर पक्षांशी बोलून आपला निर्णय कळवण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यात यशस्वी होते की राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने होणार हे येत्या 24 तासात स्पष्ट होईल.
एबीपी माझा यूट्युब लाईव्ह स्ट्रीमिंग