CET : परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीला आजपासून सुरुवात, 7 जुलैपर्यंत नोंदणीची मुदत
बारावी निकाल लागण्यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2021-22 करता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी 8 जून पासून 7 जुलैपर्यंत सुरु राहणार आहे.
मुंबई : बारावी परीक्षाबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेतल्यानंतर बारावी परीक्षेचे गुण देण्याचे निकष आणि निकाल लवकरच जाहीर केले जातील. मात्र, त्यानंतर इंजिनियरिंग, मेडिकल, फार्मसी, अॅग्रीकल्चर आदी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून केले जात आहे. त्यामुळे बारावी निकाल लागण्यापूर्वी शैक्षणिक वर्ष 2021-22 करता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी 8 जून पासून 7 जुलैपर्यंत सुरु राहील, असे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मागील वर्षी 5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या सीईटीची नोंदणी केली होती. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/qzMOaiWZnM या लिंकवर जाऊन अर्ज भरायचा आहे. सर्व पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. एमएचटी सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीनंतर 8 ते 10 दिवसांनी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच एमबीए, एमसीए, विधी, बीएड, बीए.बीएड, एमए.एमएड, फाईन आर्ट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला सुरुवात होईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बारावीच्या परीक्षेबाबत साशंकता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नोंदणीही थांबवली होती. बारावीचा निर्णय होईपर्यंत नोंदणीला सुरुवात केली नव्हती. बारावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यांकनावर निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केल्यानंतर सीईटी सेलनेही व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI