FYJC Admission : बारावीचा निकाल लागला, दहावीचा निकाल काही दिवसांवर, अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट
FYJC Admission : दहावीच्या निकालाला काही दिवस बाकी असतानाच अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात 24 मे पासून होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल (HSC Result) 21 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल (SSC Result) देखील 27 मे पर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालाबाबतचं चित्र स्पष्ट झाल्यनंतर अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अकरावीची आणि बारावीची प्रवेशप्रक्रिया 24 मे पासून सुरु होणार आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाते. राज्यातील इतर भागात ऑफलाइन पद्धतीनं होते.
केंद्रीय प्रवेश समितीनं अकरावी प्रवेशाबाबत माहिती दिल आहे. विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी www.11admission.org या वेबसाईटवर त्यांचा विभाग निवडू शकतात आणि नोंदणी करु शकतात. विद्यार्थी आणि पालक या वेबसाईटवर अकरावी प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रियेचं प्रात्याक्षिक करु शकतात, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली आहे.
दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या अर्जातील भाग अ मधील माहिती भरु शकतात. अकरावी प्रवेशाच्या एकूण जागांपैकी 85 टक्के जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. 5 टक्के जागा या व्यवस्थापन कोट्यातून तर 10 टक्के जागा त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.
अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या राबवल्या जातात. प्रवेशाची पहिली फेरी नियमित असते. त्यानंतर एक विशेष फेरी राबवली जाते. त्यानंतर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्यात येते. या तीन फेऱ्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. या तीन फेऱ्यानंतरही काही जागांवरील प्रवेश शिल्लक राहिल्यास दैनंदिन गुणवत्ता यादी तयार केली जाते. अकरावी प्रवेशाचं सविस्तर वेळापत्रक येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केलं जाईल.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार?
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं होतं. याशिवाय त्यांनी दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत माहिती दिली होती. दहावीचा निकाल 27 मेपर्यंत जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले होते. आता दहावीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरु होत आहे.
संंबंधित बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI