CBSE Board 12th Result 2021 : सीबीएसईचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार; 'या' ठिकाणी पहा निकाल
CBSE Board 12th Result 2021 Live : सीबीएसई बोर्डचा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर होणार असून बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर तो पाहता येईल.
नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डचा बारावीचा निकाल आज दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता असून बोर्डने अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.
CBSE Class XII Result to be announced today at 2 P.M.#ExcitementLevel💯%#CBSEResults #CBSE pic.twitter.com/eWf3TUGoMH
— CBSE HQ (@cbseindia29) July 30, 2021
बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला
सीबीएसईने बारावीचा निकाल (CBSE Board Result ) तयार करण्यासाठी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब केला असून त्यासाठी 13 सदस्यांच्या समितीची निर्मिती केली होती. या पॅनेलच्या वतीने मूल्यमापनाचा 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, अकरावीच्या गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज दुपारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी: यूजीसी
बारावीच्या या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात असं विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केलं जाईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र बोर्डचाही बारावीचा निकाल लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI