(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yavatmal : वणीतील हत्येचं गूढ उलघडलं; अनैतिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याने प्रेयसीच्या पतीची हत्या
यवतमाळमधील युवकाची हत्या करुन ती आत्महत्या आहे असं भासवण्यात आलं होतं. पण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत हत्येमध्ये सामिल असलेल्या आरोपींना अटक केली आहे.
यवतमाळ : वणी तालुक्यातील निलेश चौधरी या युवकाच्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ती आत्महत्या नसून हत्या होती हे आता स्पष्ट झालं आहे. अनैतिक संबंधामध्ये आपल्या प्रेयसीचा पती अडथळा ठरत असल्याने ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
वणी तालुक्यातील रासा येथील निलेश चौधरी या 30 वर्षीय तरुणांचा 29 ऑगस्ट 2021 ला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्याची आत्महत्या नसून घातपात आहे आणि हा आत्महत्या केल्याचा बनाव आहे असे पोलिसांना घटनास्थळी गेल्यानंतर प्रथमदर्शनीच लक्षात आले होते. त्यावेळी मृतकाच्या परिवाराने निलेशच्या मृत्यूचा संशय सुध्दा व्यक्त केला होता. त्यावरून पोलिसांनी या प्रकरणी तपास चक्र वेगाने फिरवीत या गुप्त माहिती आणि तांत्रिक दृष्टीने तपास करीत या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे
मृतक निलेश हा रासा या गावात राहात होता त्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रशेखर दुर्गे याचे मृतकाच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधात प्रेयसीचा पती अडसर ठरत असल्याने त्याने मृतक निलेशचा काटा काढण्याचे कट कारस्थान रचले. घटनेच्या दिवशी मृतकाला रासा गावाच्या फुलोरा जंगलात नेण्यात आले आणि तिथे चौघांनी त्याचा करकचून गळा आवळला. लगतच असलेल्या झाडाला निलेशने गळफास घेतल्याचा बनाव या आरोपींनी रचला होता हे सुध्दा पोलीस तपासात उघड झाले
निलेश याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्यावेळी त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण असल्याने पोलिसांच्या लक्षात आले आणि या प्रकरणी पोलीस तपास अधिकारी आनंद पिंगळे यांनी हत्येच्या दिशेने तपासाची व्युव्हरचना आखली. परिस्थितीजन्य पुरावे गोळा करीत त्यांनी 30 ते 40 जणांची चौकशी केली आणि गुप्त माहितीच्या आधारे एक-एक कडी जोडत तपासाची गती वाढविली. तंत्रज्ञानाची मदत घेत पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्यात यश आले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याचे इतर तीन साथीदारांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :