जान मोहम्मदला दाऊदनं दिलेली अली बुदेशची सुपारी; पण बहारीनमध्ये 'ठोकण्याचा' प्लॅन गेला फेल
गँगस्टर अली बुदेश दाऊदच्या (Dawood Ibrahim) नेटवर्कची माहिती तपास यंत्रणांना द्यायचा. त्यामुळे त्याचा काटा काढण्याची जबाबदारी जान मोहम्मदला मिळाली होती असं मुंबई एटीएसच्या तपासात समोर आलं आहे.
मुंबई : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी मुंबईतील जान मोहम्मद शेखबद्दल अधिक खुलासा झाला आहे. जान मोहम्मद 2019 मध्ये बहारीनला अली बुदेश या गॅंगस्टरची हत्या करण्यासाठी गेला होता. ही हत्या करण्यासाठी त्याला फहींम मचचने सुपारी दिली होती. मात्र काही कारणास्तव जान मोहम्मद ही हत्या करु शकला नाही आणि तो तसाच भारतात परतला.
गेल्या महिन्यात फहींम मचच याचा पाकिस्तान मधील कराची येथे मृत्यू झाला. यानंतर जान मोहम्मद उर्फ समीर कालीया हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमच्या संपर्कात आला. मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएसचे पथक दिल्लीला जान मोहम्मदची चौकशी करण्यासाठी गेलं आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती ते दिल्ली स्पेशल सेलला देणार आहेत जेणेकरून या तपासात त्यांना मदत होईल.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जान मोहम्मदला सोमवारी राजस्थानमधील कोटा येथून अटक केली होती. मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये जान मोहम्मद गॅंगस्टर अली बुदेशची हत्या करण्यासाठी गेला होता. मात्र तो हत्या करू शकला नाही आणि पुन्हा भारतात परतला. अली बुद्देशची हत्या करण्यासाठी जान मोहम्मद काही दिवस बहारीनमध्ये राहिला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आली बुदेश हा एक मोठा गॅंगस्टर आहे. त्याची हत्या करण्यासाठी जान मोहम्मद बहारीनला गेला होता. अली बुदेशचं प्रस्थ पाहून जान मोहम्मद घाबरला आणि त्याला वाटलं की जर त्याने अली बुदेशची हत्या केली तर तो भारतात परतू शकणार नाही. त्यामुळे जान मोहम्मद अली बुदेशची हत्या न करता भारतात परतला.
कोणआहे अली बुदेश?
अली बुदेश हा सुरुवातीला दाऊदसाठी काम करत होता. दाऊदच्या माणसाने अली बुदेशला दाऊदची ओळख करून दिली होती. मात्र नंतर अली बुदेश आणि दाऊदमध्ये वाद झाला आणि अली बुदेशने पाकिस्तानमध्येच असलेल्या दाउदच्या शत्रूंशी हातमिळवणी केली. तो बहारीनमध्ये स्थायिक झाला. दाऊद गॅंगशी संबंधित माहिती अली बुदेश वेळोवेळी तपास यंत्रणांना छुप्या पद्धतीने देत होता. याची माहिती दाऊदला मिळाली ज्यानंतर दाऊदने अली बुदेशचा काटा काढण्याची जबाबदारी छोटा शकीलवर सोपवली आणि छोटा शकीलने हे काम फहींम मचचला करण्यास सांगितलं.
अली बुदेश 1980 पर्यंत मुंबईत सक्रिय होता. मात्र मुंबई पोलिसांच्या भीतीने नंतर आली बुदेश देश सोडून पसार झाला. मुंबईमध्ये दाऊदचे हस्तक कोण आहेत? आणि कोण अजूनही सक्रियपणे दाऊदची मदत करत आहेत याचा शोध मुंबई पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लवकरच अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :