Yavatmal News : बँकेत ठेवीदारांची तब्बल दहा कोटींची फसवणूक; जिल्हा उपनिबंधकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात बँकेत अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Yavatmal News : यवतमाळ (Yavatmal) सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या विरुद्ध अवधुतवाडी पोलीस ठाण्यात (Yavatmal Police) बँकेत अफरातफर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. चव्हाण यांनी मे. ए. जी. जगताप फर्मवर असलेले दहा कोटींपेक्षा अधिक रक्कमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रामाणिक हेतुने तारण गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ (Yavatmal Crime) यांचे संगनमताने नोंदविला होता.
तसेच थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बँकेची सभासद आणि ठेवीदारांची फसवणुक केली, अशी तक्रार महिला बँकेच्या माजी उपाध्यक्ष मनिषा कुळकर्णी यांनी केली आहे. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब चव्हाण असल्याने पोलिसांनी चव्हाण यांच्यासह जगताप फर्मच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा उपनिबंधक सह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडचे मे. ए. जी. जगताप फर्मवर दहा कोटी रुपयापेक्षा जास्त थकीत कर्ज आहे. मात्र, थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणिक हेतूने कर्जासाठी तारण गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधकांच्या संगणमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करण्यात आले. त्यामुळे बँक, सभासद आणि ठेवीदारांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब सयाजीराव चव्हाण (40, रा. यवतमाळ), अनुपमा आनंदराव जगताप (60), अतुल आनंदराव जगताप (45), सचिन साहेबराव जगताप (45, रा. शिवाजीनगर), राजेंद्र लक्ष्मणराव वरटकर (53, रा. भाग्योदय सोसायटी, यवतमाळ), अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
बँकेतील सर्व व्यवहाराचे अधिकार नानासाहेब चव्हाणांकडे
तक्रारदार अॅड. मनीषा प्रदीप कुळकुर्णी (51) या बँकेच्या माजी उपाध्यक्ष आहेत. सहकार आयुक्तांच्या आदेशाने 11 नोव्हेंबर 2022 ला जिल्हा उपनिबंध चव्हाण यांची बँकेवर अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँकेतील सर्व व्यवहाराचे अधिकार देखील त्यांना बहाल करण्यात आले होते. बँकेची कर्जवसुली, दैनंदिन व्यवहार, कर्मचारी आणि त्यांचे कामाचे नियमन आदी अधिकारही अवसायकांना होते. तर मे. ए.जी. जगताप फर्मचे जगताप कुटुंबीय हे देखील भागीदार आहेत. त्यातील एक भागीदार आनंदराव जगताप यांचा मृत्यू झाला आहे.
जगताप फर्मतर्फे बँकेकडे रोख ऋण करण्यात आले. बँकेकडून 23 ऑक्टोबर 2005 मध्ये मर्फला एक कोटी दहा लाखाची कर्ज मर्यादा मंजूर करण्यात आले होती. त्यानुसार बँकेत फर्मचे ऋण खाते सुरू करण्यात आले. 29 नोव्हेंबर 2014 ते 21 नोव्हेंबर 2015 या कालावधीत फर्मला बँकेकडून दोन कोटी 65 लाखाचे कर्ज मंजूर करण्यात आले. त्यानंतर पुन्हा 50 लाखाची कर्ज मर्यादा वाढवून मिळण्याचा प्रस्ताव बँकेकडे सादर केला. त्यावरून या प्रस्तावाला तत्कालीन अध्यक्ष आणि संचालकांनी हिरवी झेंडी दिली. सर्वप्रकारचे दस्त, कर्जाच्या अटींबाबत स्विकृती नामा आदी दस्त करून दिले. नवीन नोंदविलेल्या खात्यामधून मर्फने दोन कोटी 74 लाख 78 हजार 85 रुपयाची रक्कम पूर्वीच्या सुरू असलेल्या खात्यात वळती करून ते खाते बंद केले.
कर्जदारांशी संगणमत करून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप
30 नोव्हेंबर 2023 रोजी फर्मकडे सात कोटी 24 लाख 90 हजार 790 रुपये इतकी कर्जाची रक्कम थकीत राहिली. त्यामुळे कर्जाबाबत कर्जदारांनी वाद उपस्थित केल्याने बँके तर्फे महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्याच्या कलम 91 नुसार लवाद अमरावती सहकार न्यायालयात दाखल केला. फर्मचे संचालक सचिन जगताप याने ट्रेडर्स अॅण्ड बिझनेस टर्म लोनचे नवीन खाते बँकेत सुरू करून एक कोटी 20 लाखाची उचल केली. दरम्यान कर्ज उचल केल्याच्या तारखेपासून परत कधीही रक्कम परतफेड केली नाही. 1 फेब्रुवारी 2024 पर्यंत जगताप फर्मकडे दहा कोटी पेक्षा अधिक कर्ज थकीत आहे. तसेच कर्जाला तारण म्हणून स्थावर मालमत्ता बँकेकडे गहाण करून दिली आहे. फर्म भागीदारांचे स्थावर मालकी हक्काचे दस्त देखील बँकेच्या ताब्यात आहे.
मात्र, अवसायक चव्हाण यांनी कर्जदारांकडे दहा कोटी पेक्षा जास्त रक्कम थकीत असताना, अवसायकांचे सल्लागार अॅड. राहुल शेंद्र यांना सहकार न्यायालयात न्यायप्रविष्ठ लवाद मागे घेण्याबाबत लिखित पत्र देऊन संयुक्तीक कारण नमूद न करता आदेशीत केले. अवसायकांनी कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार लगाद मागे घेण्याबाबत पत्र दिले. त्यात पत्रात कोणताही उल्लेख नव्हता. लवाद न्यायालयात अतिशय महत्त्वाचा पुरावा गोळज्ञ करण्याच्या टप्प्यावर होता. असे असूनही कोणतीही शहानिशा न करता अवसायकांनी कर्जदारांशी संगणमत करून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अॅड. मनीषा कुळकर्णी यांनी शनिवार 17 फेब्रुवारीला अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यावरून अवसायकांसह पाच जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या