(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yavatmal Crime : चोरीच्या संशयातून बेदम मारहाण, तरुणाने जीव गमावला; तिघांना बेड्या
Yavatmal Crime : यवतमाळच्या मादणी या गावात चोरीच्या संशयातून एका तीस वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना घडली आहे.
Yavatmal Crime : यवतमाळच्या (Yavatmal) बाभूळगाव तालुक्यातील मादणी या गावात चोरीच्या संशयातून एका तीस वर्षीय युवकाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली. मंगेश लक्ष्मण डेहणकर (वय 39, वर्ष रा. मादणी) असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. निलेश गजानन जतकर (वय 32 वर्षे), संतोष सुरेश चौधरी(वय 28 वर्षे) आणि सागर गजानन जतकर (वय 30 वर्ष सर्व रा. मादणी) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
चोरीचा संशय आल्याने लाठीकाठीने मारहाण, जखमी अवस्थेत हॉटेलमध्ये नेऊन फेकलं
बाभुळगाव तालुक्यातील मादणी येथील मंगेश डेहणकरने शेतातील साहित्याची चोरी केल्याच्या संशयावरुन गावातील निलेश जतकर, संतोष चौधरी आणि सागर चौधरी या तिघांनी त्याला गावात गाठून त्याची विचारपूस केली. त्यानंतर त्याला शेतात नेऊन लाठीकाठीने हातपाय बांधून मारहाण केली होती. यानंतर जखमी अवस्थेत मंगेश डेहणकरला एका हॉटेलमध्ये आणून टाकलं. दरम्यान गंभीर जखमी झाल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला.
मृतदेहावर मारहाणीच्या खुणांमध्ये पोलिसांचा संशय वाढला
बस स्टॅण्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगेश डेहणकरचा मृतदेह आढळला. अतिमद्यपान केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. यानंतर बाभुळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ग्रामीण जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्याने मृत्यू अतिदारु प्यायल्याने झाला नसून इतर कारणाने झाल्याचं संशय पोलिसांना आला. त्यानुसार मृतदेह यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. इथे केलेल्या शवविच्छेदनात त्याचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं समोर आलं.
या प्रकरणी मृत मंगेश डेहणकरचा भाऊ गजानन डेहणकर यांनी बाभुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले. त्या तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असता, त्यांनी मंगेशची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली.
वर्ध्यात बकऱ्या चोरल्याच्या संशयातून हत्या
सप्टेंबर महिन्यात वर्ध्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. बकऱ्या चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील खापरी (शिवनगाव) इथे घडली होती. आरोपीने संबंधिताला आपल्या गाडीवर बसवत शेतात नेलं. तिथे बकऱ्या चोरल्याच्या करणातून वाद करत काठीने डोक्यावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं. सुरेश देवराव आत्राम (वय 42 वर्षे रा.वनग्राम (चौकी) ता हिंगणा, जिल्हा नागपूर) असं मृताचं नाव आहे. तर अविनाश वसंतराव वासकर (वय 35 वर्षे रा, खापरी) असे आरोपीचं नाव आहे, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गावातूनच ताब्यात घेतलं.