Urfi Javed Viral Video Case: उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओमुळे अडचणीत; गुन्हा दाखल होताच दुबईला पळाली?
Mumbai News: अभिनेत्री उर्फी जावेदविरोधात गुन्हा दाखल झाला असून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी उर्फीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Urfi Javed Viral Video Case: मुंबई पोलिसांची (Mumbai Police) बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर (Urfi Javed) झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, उर्फीनं केवळ मुंबईतूनच नाहीतर चक्क देशातून काढता पाय घेतल्याची माहिती मिळत आहे. गुन्हा दाखल होताच, उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेली. दरम्यान, या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
उर्फी जावेद व्हिडीओ व्हायरल प्रकरणात ओशिवरा पोलिसांनी उर्फी जावेदसह 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करताच उर्फी जावेद देशाबाहेर दुबईमध्ये निघून गेल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची स्कार्पिओ गाडी ओशिवरा पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतली आहे. उर्फी जावेद काल (शुक्रवारी) सकाळी अंधेरी पश्चिमेत लोखंडवाला बॅक साईड रोडवर एका कॉफी शॉपमध्ये कॉफी पित होती. तेवढ्यात तिथे दोन महिला पोलिसांनी शॉर्ट कपडे घातल्यामुळे उर्फीला ताब्यात घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस गाडी घेऊन दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक पोलिस अधिकारी दिसत होते, मात्र ते खोटे पोलीस असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची बदनामी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणांमध्ये काल संध्याकाळी ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पोलिसांची गाडी ओशिवरा पोलिसांनी जप्त केली आहे. तर उर्फी जावेदसह इतर पाच ते सहा आरोपींना पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं दिसतंय काय?
उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन पोलीस महिला तिला ताब्यात घेताना दिसत आहेत. आश्लील व्हिडीओप्रकरणी उर्फीला अटक ताब्यात घेत असल्याचं त्या व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे. सुरुवातीला अनेकांना हा व्हिडीओ खरा असल्याचं वाटत होतं. पण केवळ प्रसिद्धीसाठी उर्फी जावेदनं हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसून येतं आहे. तो व्हिडीओ लोकांना खरा वाटला, त्यामुळे संपूर्ण देशात आणि जगात महिलांनी अपुरे कपडे घालण्यास मुंबई पोलीस हे अटक करतात, असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली.
स्वस्त प्रसिद्धीसाठी कुणी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही
केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी कोणीही कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं. मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडीओ खरा नाही, त्यामध्ये पोलिसांचे सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे. पण हा व्हिडीओ दिशाभूल करणारा असल्याचं सांगत पोलिसांनी उर्फी जावेदवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्हिडीओतील तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि त्यातील वाहनही जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.