Pushpa : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील 'पुष्पा' गजाआड, साग आणि खैराची तस्करी करणाऱ्या कुख्यात तस्कराला ठोकल्या बेड्या
Smuggling Accuse Arrested : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर साग आणि खैर झाडाची कत्तल करून लाकडाची तस्करी करणारा कुख्यात तस्कर नवसुभाई लोहार वन विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
नाशिक : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील जंगलामध्ये हैदोस घालणाऱ्या लाकूड तस्कर 'पुष्पा'च्या वन विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिकांच्या मदतीने जंगलात घुसखोरी करून साग आणि खैर झाडाची कत्तल करून लाकडाची तस्करी सुरु होती. मूळचा गुजरातमधील असणारा कुख्यात तस्कर नवसुभाई लोहारचा 'पुष्पा' नावाने तस्करीत दबदबा होता. वन विभाग गेल्या दहा वर्षांपासून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर वनविभागाच्या जाळ्यात 'पुष्पा' अडकला असून त्याला पाच दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील 'पुष्पा' गजाआड
लोहार जिथे वृक्षाची वृक्षाची कत्तल करून तस्करी करत होता, त्या दुर्गम भागात, घनदाट जगंलात जाऊन वन विभागाने चौकशी केली असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. तसेच लाकडाची तस्करी करून ज्यांना त्याचा पुरवठा केला जात होता, त्या गुजरात राज्यातील व्यापारीही वन विभागाच्या रडारवर आले आहेत. 'पुष्पा' चित्रपटातील 'पुष्पा' या पात्रासारखा पेहराव करून पुष्पाचे फोटो असणारा शर्ट परिधान करून लोहार या परिसरात दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत होता. या 'पुष्पा'च्या अटकेने अंतरराज्यीय लाकूड तस्करी करणारी मोठी टोळी गजाआड जाण्याची शक्यता आहे.
साग आणि खैराची तस्करी
वन विभागाचे पश्चिम विभागीय व्यवस्थापक सुजित नेवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गाव आणि परिसरात 'पुष्पा' या नावाने ओळखला जातो. तो 'पुष्पा' चित्रपटातील पात्राप्रमाणे दहशत पोहवण्याचा आणि समाजामध्ये चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता. या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो. काही दिवसांपूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं. कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कष्टडी दिली आणि पुन्हा वाढवून पाच दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आहे.
कुख्यात तस्कराला पकडण्यात वन विभागाला यश
आरोपी लोहारकडून त्याच्या इतर त्याच्या साथीदारांची नावे मिळाली आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. सीमावर्ती भागामध्ये पोलिसांंनी आरोपीला नेऊन जंगलात पंचनामे केलेला आहेत. दरम्यान, सामान्य नागरिकांमध्ये प्रवृत्तींचा वाढू नये, यासाठी पोलिसांकडून जनजागृतीही सुरु आहे.
व्यापाऱ्यांवरही पोलिसांकडून लवकरच कारवाई होणार
पोलिसांनी सांगितलं की, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भागात आणखी अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेली आहेत. तसेच गुजरातमधील व्यापाऱ्यांना या लाकूड तस्करांकडून पुरवठा होत होता, त्यामुळे व्यापाऱ्यांवरही पोलिसांकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा स्टेटस ठेवून त्यांना प्रवृत्त करु नये, अशा व्यक्ती आणि अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच विरोध केला पाहिजे.