Solapur News : माजी आमदाराच्या कार्यालयात वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल; सोलापूरमध्ये खळबळ
Solapur Crime News : माजी आमदार नरसय्या आडम यांच्या दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयामध्ये एका वृद्धाने दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
Solapur News : माजी आमदारांच्या कार्यालयात एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील (Solapur) दत्तनगर परिसरात ही घटना घडली. अल्लाउद्दीन शेख (वय 80 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. शेख यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
सोलापूरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या दत्तनगर येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPIM) आणि सिटू संघटनेच्या लालबावटा कार्यालयामध्ये एका वृद्धाने दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा कार्यालयात कोणीही नव्हते. दरम्यान अल्लाउद्दीन शेख यांनी आज सकाळी माजी आमदार आडम यांची भेट घेतली होती.मात्र दुपारी कार्यालयात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
दरम्यान संबंधित व्यक्ती हा सध्या आमचा कार्यकर्ता नसून काही वर्षांपूर्वी त्यांनी माकपसाठी काम केले होते असे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मागील काही वर्षांपासून त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नव्हता, असे नरसय्या आडम यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अल्लाउद्दीन शेख हे 1979 च्या सुमारास माकपच्या संपर्कात आले होते. गांधीनगर परिसरातील झोपडपट्टी वाचवण्याच्या आंदोलनात शेख यांनी माकपच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. 1985 मध्ये शेख यांनी माकपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक ही लढवली होती. मात्र, पुढे पक्ष सभासदत्व त्यांनी नूतनीकरण केले नाही. त्यानंतर शेख हे जनता दल, काँग्रेस अशा विविध पक्षांमध्ये कार्यरत होते. आडम मास्तर यांचा कामगार, स्थानिकांमध्ये चांगला संपर्क आहे. त्यामुळे शेख यांच्यासोबत त्यांचा परिचय होता.
आज सकाळच्या सुमारास शेख यांनी मास्तरांसोबत चर्चा केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास कौटुंबिक कारणास्तव नरसय्या आडम हे कार्यालयातून बाहेर पडले. त्याच सुमारास कार्यालयात फारशी गर्दी नव्हती. त्यानंतर आत्महत्या केलेले वृद्ध शेख यांनी कार्यालयातील एका खोलीत स्वत:ला बंद करत गळफास घेतला.