Smuggling gold : चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी, नागपूर विमानतळावरुन तिघांना अटक
नागपूर विमानतळावर कोणाकडे ही बॅग सोपवायची आहे, त्या व्यक्तींचे फोटोही यादव कडे देण्यात आले होते. दुबई वरून काही तस्कर गरीब भारतीय मजुरांच्या वापर करून सोने तस्करी करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
नागपूरः दुबईतून चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आली आहे. या प्रकरणात तीन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळील लोखंडी हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजारात लपवलेले 337 ग्रॅम सोने आढळले आहे. हे साहित्य दुबई वरून भारतात घेऊन येणारा मजूर असून तो उत्तर प्रदेश मधील आजमगड येथील रहिवासी आहे. तर विमानतळावर त्याच्याकडून अवजारांची ती बॅग घ्यायला आलेले दोन्ही आरोपी राजस्थानच्या नागौरचे आहेत. त्यामुळे नागपूर विमानतळ हे परदेशातून होणाऱ्या सोने तस्करीचे नवे रूट तर बनले नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सोने वितळून अवजारांमध्ये लपवले
मजूरांनी सोन्याची तस्करी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आणि पकडल्या जाऊ नये म्हणून हातोडा, मोठे स्टेपलर व इतर काही अवजारांमध्ये असलेल्या छिद्राच्या माध्यमातून त्यात सोने वितळून टाकले. अवजारांमध्ये सोने वितळून लपवले जाते आणि नंतर हे अवजार एखाद्या मजुराच्या माध्यमातून भारतात पाठवले जाते. सहा सप्टेंबरला उत्तर प्रदेशातील आझमगडचा मजूर राहुल यादव दुबई वरून भारतात परत आला. आपल्याकडील अवजारांची बॅग त्याने नागपूर विमानतळावरील पार्किंगमध्ये अक्रम मलिक आणि इर्शाद खान नावाच्या नागौर जिल्ह्यातील दोघांच्या हवाली केली. दुबई वरून (Gold Smuggling Nagpur) सोने तस्करी होत असल्याच्या संशयावरून आधीच विमानतळावर पाळत ठेवलेल्या नागपूर पोलिसांना तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी बॅग ची तपासणी केली आणि त्यात हातोडा, स्टेपलर आणि इतर अवजार पाहून ह्या वस्तू दुबई वरून विमानाने कशा आणि का आणल्या या प्रश्नांचे उत्तर तिघे देऊ शकले नाही. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील अवजारांची सोनारकडून तपासणी केली असता, छुप्या छिद्रातून 337 ग्रॅम सोने तस्करी केल्याचे उघड झाले.
मोती खानने केली तिकीटाचीही व्यवस्था
तिन्ही आरोपींच्या आतापर्यंतच्या तपासाप्रमाणे आजमगडचा (Azamgarh) मजूर राहुल यादव याला दुबईत मोती खान नावाच्या व्यक्तीने एक बॅग भारतात (smuggled gold) आमच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा असे आमिष दिले होते. त्यासाठी राहुल यादवची दुबई वरून नागपूर पर्यंतच्या प्रवासाची विमानाची तिकीट. तसेच नागपूर वरून उत्तर प्रदेश पर्यंतच्या रेल्वे प्रवासाच्या तिकीटांची व्यवस्था करून दिली होती. सोबतच नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) कोणाकडे ही बॅग सोपवायची आहे, त्या व्यक्तींचे फोटोही राहुल यादव कडे देण्यात आले होते. दुबई वरून काही तस्कर गरीब भारतीय मजुरांच्या वापर करून नागपूर मार्गे सोने तस्करीचा नवा मार्ग निर्माण करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
महागडे मोबाईलही दुबईतून नागपुरात
पाच सप्टेंबर रोजी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या (ganeshpeth nagpur police station) हद्दीत नागोरच्या मोहम्मद जहांगीर अली नामाच्या वैयक्तिक करून एप्पल कंपनी चे चार महागडे फोन, ॲपल कंपनीच्या चार महागड्या घड्याळ आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तूची बॅग हिसकावून अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची ती खेपही दुबई वरून नागपुरात गोरखपूरच्या एका मजुराने आणली होती आणि नंतर ती बॅग नागपूर विमानतळावर मोहम्मद जहागीर अलीच्या हातात दिली होती. दुबई वरून गरीब मजुरांनी सोपवलेली बॅग भारतापर्यंत आणणे आणि नागपुरात ती राजस्थानच्या नागोर जिल्ह्यातील लोकांच्या हातात सोपवणे, अशा एकापाठोपाठ दोन घटना घडल्यानंतर तस्करांनी सोने आणि महागडे इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात कस्टम ड्युटी चुकवून आणण्यासाठी नागपूर विमानतळाचा नवा मार्ग स्थापित केल्याचा संशय निर्माण झाला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या