Share Market : शेअर बाजारात नफ्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक, विलेपार्ले पोलिसांत गुन्हा दाखल
Share Market Fraud : शेअर बाजारात नफा मिळवून देतो असं सांगत एका कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला असेल तर तुम्हाला अधिक सतर्क राहावं लागेल. कारण मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात एका पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनीने लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्यामुळे मुंबईत सुमारे 15-20 लोकांची फसवणूक झाली आहे. तसेच जयपूर आणि जोधपूरमध्येही अनेक लहान कुटुंबांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून अधिक नफ्याचा फायदा दाखवून ग्राहकांना आकर्षित केलं जात होतं. नफा कमावल्याची खोटी माहिती देऊन हे आरोपी फसवणूक करत होते. मात्र ते नफा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात वर्ग करत होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे माहिती झाल्यावर वांद्रे पूर्व येथील प्रॉपर्टी डीलर सुनील गिरी यांना संशय आला आणि त्यांनी तक्रार केली.
या घोटाळ्याची नोंद विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये झाली असून त्यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अर्थवृद्धी सिक्युरिटीजचे संचालक सुनील जेल, मालक धीरेन शुक्ला आणि अनुराग शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. तर फर्मचे व्यावसायिक सल्लागार जयराज बाफना यांना या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
या ब्रोकर कंपनीचे कार्यालय असलेल्या विलेपार्ले येथे याआधी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. नोंद करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, जुलै 2019 मध्ये अर्थवृद्धी सिक्युरिटीजच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने पीडितेशी संपर्क साधला. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये सुनील गिरी आणि आरोपी यांच्यात बैठक झाली. यामध्ये गिरी यांनी आरोपीचे ट्रेडिंग अकाउंट मॅनेज करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर या आरोपींनी गिरी यांच्या ब्लू सी इंटरनॅशनल कंपनीत डीमॅट खाते उघडले. गिरी यांनी त्यांचे डीमॅट खाते तपासले आणि त्यात केलेल्या नोंदी आणि आरोपींनी त्यांना दिलेले तपशील जुळत नसल्याचे आढळले.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना ईमेल आणि अहवाल बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर गिरी यांनी राष्ट्रीय शेअर बाजाराशी संपर्क साधला. जैन आणि बाफना यांनी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे एनएसईला आढळले.
या कंपनीने सुमारे 10 कोटींचा घोटाळा झाला आहे, ज्याची दखल स्वतः एनएसईने घेत या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. आता मुंबई पोलिसांत दोन एफआयआर दाखल करण्यात आले असून अशा आणखी किती कंपन्या गुंतवणूकदारांची फसवणूक करत आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.
असे अनेक लोक आहेत ज्यांनी शेअर मार्केटमध्ये कंपनीच्या माध्यमातून पैसे गुंतवले आहेत. त्यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेऊन बनावट डिमॅट खाती उघडण्यात आली आणि या पैशांतून कंपनीने हा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे.
























