बिल्डरच्या छळाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाची बिल्डरच्या घरासमोर आत्महत्या
बिल्डरची बेईमानी जगासमोर आणण्यासाठी या आजोबांनी चक्क बिल्डरच्या घरासमोर स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेतले होते.
नागपूर : बिल्डरसोबत दुकानाचा सौदा करुनही अनेक वर्ष दुकान बांधून न देणाऱ्या बिल्डरच्या छळाला कंटाळून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बिल्डरची बेईमानी जगासमोर आणण्यासाठी या आजोबांनी चक्क बिल्डरच्या घरासमोर स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेतले होते. काही दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 जूनला त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर आरोपी बिल्डर रवी गुप्ताला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अटक केली आहे.
सध्या दुसरा भागीदार बिल्डर फरार आहे. 64 वर्षांचे सुरेश कनोजिया 4 वर्षांपूर्वी रेल्वेमधून लोको पायलट पदावरून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर मुलगा आणि स्वतःसाठी एक व्यवसाय सुरु करण्याच्या उद्दिष्टाने त्यांनी रामेश्वरी परिसरात बिल्डर रवी गुप्ता कडून बांधण्यात येत असलेल्या 15 दुकानांपैकी एक दुकान खरेदी करण्याचा सौदा केला होता. 15 लाख रुपयांच्या दुकानासाठी त्यांनी करार करताना 2017 मध्येच 6 लाख रुपये बिल्डरला दिले होते. मात्र त्यानंतर ही अनेक महिने दुकानांच्या निर्माणाचे काम पुढे जात नसल्याचे पाहून ते निराश होऊन बिल्डरकडे वारंवार विचारणा करायचे. मात्र, बिल्डर गुप्ता नेहमीच त्यांना नव्या अडचणी सांगून लवकरच काम पूर्ण करू अशी थाप मारायचा. अखेरीस 2018 मध्ये बिल्डर कडून बांधण्यात येत असलेल्या सर्व 15 दुकाने बेकायदेशीर आणि अतिक्रमणाच्या जागेवर असल्याचे सांगून नागपूर सुधार प्रन्यास कडून ते बांधकाम पाडण्यात आले होते.
बांधकाम पडल्यापासून आपली फसवणूक झाली या भावनेतून सुरेश कनोजिया सतत बिल्डरकडे आपले पैसे परत मागायचे. अनेक वेळा तगादा लावल्यानंतर बिल्डरने त्यांना 2 लाख रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रक्कम देण्यास बिल्डर टाळाटाळ करत असल्याने सुरेश कनोजिया त्याच्या घरी नेहमीच जायचे. 8 जूनच्या सकाळी ही कनोजिया पार्वतीनगर परिसरात बिल्डर रवी गुप्ताच्या घरी गेले असता त्याने भेट नाकारली. त्यांनतर निराश झालेल्या कनोजिया यांनी बिल्डरच्या घरासमोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घेत स्वतःला जाळून घेतले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखले केले असता उपचारादरम्यान 10 जूनच्या रात्री त्यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला हे अपघात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होत नव्हते. मात्र, तपासानंतर बिल्डरनेच सुरेश कनोजिया यांचा छळ करत त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आणि नुकतंच अजनी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी बिल्डर रवी गुप्ता विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.