Navi Mumbai Crime : सीवूड्समधील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचं गुढ उकललं, संपत्ती हडपण्यासाठीच पत्नी आणि तिच्या प्रियकराने केली हत्या
Navi Mumbai Murder : नवी मुंबईच्या सेक्टर-44 मध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिक असलेल्या मनोजकुमार सिंह याची त्याच्याच कार्यालयात हत्या करण्यात आली होती.
नवी मुंबई: सीवूड्समध्ये शनिवारी घडलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचं (Seawoods Builder Murder) गुढ उलगडले आहे. मनोजकुमार सिंह याच्या हत्येमध्ये त्याच्या पत्नीचा आणि तिच्या प्रियकराचा समावेश असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या हत्या प्रकरणात राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान (22) याच्यासोबत बांधकाम व्यावसायिकाची पत्नी पुनम सिंह (34) हिला अटक केली आहे.
राजू आणि पुनम या दोघांमध्ये प्रेमसंबध निर्माण झाल्यानंतर त्यांनी मनोजकुमार सिंहचीची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी मध्यरात्री मनोजकुमार सिंह हा त्याच्या कार्यालयात एकटाच असताना, अज्ञात मारेकऱ्याने त्याच्यावर जड वस्तूने हल्ला करुन त्याची हत्या केली होती.
कार्यालयातच केली हत्या
नवी मुंबईच्या सेक्टर-44 मध्ये राहणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिक असलेल्या मनोजकुमार सिंह याची त्याच्याच कार्यालयात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शनिवारी (14 जानेवारी 2024) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेनंतर एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. एखाद्या जवळच्याच व्यक्तीनं बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह याची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.
गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मारेकऱ्याचा शोध सुरू केला. दरम्यान, बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह यांच्यावर फसवणूक केल्याचे तीन गुन्हे आधीपासूनच दाखल करण्यात आले होते. त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला.
पत्नी आणि तिचा प्रियकरच निघाले मारेकरी (Seawoods Builder Murder)
मनोजकुमार सिंह याच्या हत्येचा तपास सुरू असताना पोलिसांना त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. त्यानंतर पत्नी पुनम सिंह आणि तिचा प्रियकर राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान यांचे सीडीआर तपासण्यात आले. त्यानंतर ही हत्या या दोघांनीच केल्याचं समोर आलं.
मनोजकुमार सिंह याची संपत्ती हडपण्यासाठीच ही हत्या त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने केली असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
ही बातमी वाचा:
Hingoli Crime : झोपेच्या गोळ्या अन् विजेचा शॉक, क्राईम पेट्रोल पाहून तीन दिवसात आई-वडील आणि भावाचा काटा काढला; असं घडलं हिंगोलीतील हत्याकांड