Maharashtra Minister Bungalow : महायुतीच्या मंत्र्यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर 8 दिवसांनी मंत्र्यांचे खातेवाटपही पार पडले. त्यामध्ये, अनेक नेत्यांच्या खात्यांची खांदेपालट करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर, काही नेत्यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ (Minister) खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे आणि दालनाच्या पाठोपाठ सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांना शिवगिरी बंगल्याची चावी मिळाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे.
महायुतीच्या 31 मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं असून त्याची यादीही समोर आली आहे. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखे पाटलांना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत तर गणेश नाईकांना पावनगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडेंना सातपुडा, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, आधी मंत्रीपदावरुन, नंतर खातेवाटपावरुन काही नेत्यांमध्ये नराजाी पाहायला मिळाली. मात्र, आता बंगले वाटपावरुनही मंत्र्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, गत बहुतांश मंत्र्यांना त्यांचेच बंगले अलोट करण्यात आल्याचं यादीवरुन दिसून येते.