(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ratnagiri: रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून, आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, गावकऱ्यांनी केला सरकारी वकिलांचा सत्कार
Ratnagiri Crime: पाच वर्षानंतर न्यायालयाने न्याय देत आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
रत्नागिरी: पाच वर्षापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सुकिवली येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी आज एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालानंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत सरकारी वकिलांचा सत्कार केला.
खेड तालुक्यातील सुकिवली गावातील चव्हाणवाडी येथे 19 जुलै 2018 रोजी श्रुती सतीश चव्हाण या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. त्यानंतर शौचालयाच्या टाकीमध्ये तिचा मृतदेह लपवण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत नवनाथ चव्हाण या आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. हा आरोपी देखील सुकिवली गावातील होता आणि मुलीच्या नात्यात होता.
या प्रकरणाची सुनावणी खेड येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. बुधवारी या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपी सूर्यकांत चव्हाण याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. खेडचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी गावकऱ्यांनीही सरकारी वकिलांचा सत्कार करून गौरव केला. या प्रकरणात सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद आणि सबळ पुरावे तपासून या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनंतर तब्बल पाच वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी 19 जुलै 2018 रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील ती सापडली नाही, म्हणून तिच्या वडिलांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दुसऱ्या दिवशी त्या अल्पवयीन मुलीचा डोक्याचा पट्टा गावातील एका इसमाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसून आला. त्यानंतर ग्रामस्थ आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर आणि सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय 29) याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीअंती सूर्यकांत चव्हाण याने गुन्ह्याची कबुली दिली आणि मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली. खेड पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 376 (आय), 363, 364, 201 आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दखल केला. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय वर्ग 1 येथे आरोपी सूर्यकांत विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात तब्बल 28 साक्षीदार तपासण्यात आले.
सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. सरकारी वकील अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश डी.एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी आणि आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
अल्पवयीन बालकाच्या विरोधात गुन्हा करणाऱ्या नराधमाना कठोर संदेश देणारा निर्णय आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे 45 वर्षानंतर एखाद्या आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.