(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : माजी मंत्र्यांचा सचिव असल्याची बतावणी; कर्ज माफीच्या नावाखाली वृद्धाला लाखोंचा गंडा
Pune Crime News: माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या बनावट सचिवाने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला घातला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News : पुण्यात सध्या राजकीय नेत्यांच्या नावे (Pune crime) फोन करुन पैसे उकळणे आणि धमक्या देण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मनसे नेते वसंत मोरे यांच्यानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या बनावट सचिवाने पुण्यात ज्येष्ठ नागरिकाला घातला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गगन केशव रांहाडगळे असे माजी मंत्र्याच्या बनावट सचिवाचं नाव आहे. त्याच्यासोबत गोरख तनपुरे (वय 40), विशाल पवार (वय 35, दोघे रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कल्याणीनगरमध्ये ऑक्टोबर 2021 ते आतापर्यंत घडला आहे.
आरोपी गगन रांहाडगळे याने गृह कर्ज माफ करून देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक केली. पुण्यातील येरवडा परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध नागरिकाला त्यांच्या घरावर असलेल्या एका खाजगी बँकेची कर्जची कोट्यावधी रुपयांची रक्कम मंत्र्याच्या मार्फत माफ करून देतो अशी थाप मारली आणि तब्बल 59 लाख रुपये उकळले. माजी मंत्र्याच्या नावाने वृद्धांना लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय नेत्यांच्या नावे पैसे उकळल्याच्या प्रकारात वाढ
मागील काही दिवसांपासून पुण्यातील नेत्यांना धमक्यांचे फोन किंवा नेत्यांच्या नावाने खंडणी उकळण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापूर्वी हा माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका व्यावसायिकाकडे (Builder) तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली होती. संदीप पाटील आणि शेखर ताकवणे अशी अटक केलेल्या दोघांची नावं होती. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये द्या असं म्हणत या दोघांनी एका बिल्डरकडे खंडणी मागितली होती.
एकच व्यक्ती करायचा फोन...
राजकीय नेत्यांना धमकीचे फोनदेखील केले होते. त्यात महेश लांगडे, अविनाश बागवे, वसंत मोरे या नेत्यांना धमकीचे फोन करण्यात आले होते आणि त्यांना विविध प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर तिघांनाही धमकी देणारा एकच व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. हा व्यक्ती कोंढवा- वानवडी परिसरात मॅरेज ब्युरो चालवतो. याच मॅरेज ब्युरोत आलेली एक मुलगी या व्यक्तीला आवडली. त्या व्यक्तीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र या मुलीने नकार दिल्याने त्याने तिच्या फोननंबर सांगून सगळ्यांना धमकी देत खंडणी मागायला सुरुवात केली होती. मात्र त्याचा हा प्लॅन पुणे पोलिसांनी उघडकीस आणला.