(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : हडपसर पोलीस स्टेशनसमोर बंद गाडीत मृतदेह सापडला, प्रचंड खळबळ
Pune Hadapsar Crime News : पोलीस स्टेशनसमोरच्या एका गाडीतून दुर्गंध येत असल्याने पोलिसांनी पाहणी केली, त्यानंतर त्या गाडीच्या मागच्या सीटवर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं.
पुणे : हडपसर पोलीस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या एका गाडी मृतदेह (Pune Crime News) आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घटना उघडकीस आली. सतीश प्रभू कांबळे (वय 45) असे मयत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर एक व्हॅगनार गाडी होती. या गाडीच्या मागील सीटवर एक व्यक्ती झोपल्याचे आढळून आले. दरम्यान गाडीतून दुर्गंधी येत असल्याने हडपसर पोलिसांनी पाहणी केली असता एक व्यक्ती झोपल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, मृतदेह आढळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन परिसरात बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीतच असलेल्या अमित सतीश कांबळे या तरुणाने संबंधित व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगितले. त्यांना दारूचे व्यसन असून डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते सतत घरातून निघून जातात असे सांगितले.
या घटनेची हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.
फुटपाथवर झोपण्यावरुन वाद, एकाची हत्या
फुटपाथवर झोपण्याच्या वादातून 75 वर्षीय फिरस्त्याचा धारदार (Pune Crime News) हत्यारांनी वार करून खून करण्यात आला आहे. रविवारी 10.30 वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही घटना घडली.
मंगेश भागाजी भद्रिके (वय 75, रा. खडकी रेल्वे स्टेशन फुटपाथ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामचंद्र गायकवाड (रा. खडकी बाजार चौपाटी, खडकी) याला अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक अण्णा बादशाह गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि भद्रिके हे फुटपाथवर राहतात. या दोघांमध्ये फुटपाथवर झोपण्यावरून वाद झालेला होता. त्यावेळी गायकवाड याने दारू पिऊन येऊन धारदार हत्याराने भद्रिके यांच्या डोक्यावर, पाठीवर, हातावर वार करून त्यांचा खून केला.
गेल्या काही काळात पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं दिसून येतंय.
ही बातमी वाचा: