Pune Crime : पुण्यात 20 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका 20 वर्षीय तरुणाची पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन हत्या केली.
पुणे : पुण्यात खुनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मागील आठवड्यातच कट रचून तरुणाची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणाची सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून हत्या झालाचा संशय पोलिसांना आहे. मारुती लक्ष्मण ढेबे असं 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. काल (23 मार्च) वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मारुती ढेबे हा नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसला होता. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाच ते सहा जणांचं टोळकं एका लाल रंगाच्या कारमधून आलं. हल्लेखोर दुकानात शिरले आणि त्यांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. यात मारुती ढेबा जागीत गतप्राण झाला. यानंतर मारेकरी त्याच कारमधून बसून निघून गेले. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ऐन संध्याकाळी आणि वर्दळ असतानाच हत्या झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. दरम्यान ही सर्व घटना दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
खुनाची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी ससून रुग्णालयात पाठवला असून हवेली पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. परंतु हल्ल्याच्या वेळी आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे हल्लेखोरांना पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
हे ही वाचा
Pune Crime : पुण्यातील हत्याकाडांला वेगळं वळण, कट रचून 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची माहिती