पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा पीएसआय महिलेसोबत अनैसर्गिक अत्याचार
पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे.
पुणे : शहरातून महिला अत्याचाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत अनैसर्गिक संबंध ठेवले, त्यानंतर या महिलेस सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
हरीश सुभाष ठाकूर (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात भा दं वि 307, 494, 498, 377, 506 सह पॉक्सो कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार 2013 पासून वारंवार घडला आहे. खडकी पोलिस ठाण्यात या प्रकरणी संबंधित एपीआय वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातच काम करणाऱ्या 33 वर्षीय पीएसआय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांना आरोपीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, अशी खोटी माहिती दिली. फिर्यादीसोबत विवाह केला असता लग्नानंतर आजपर्यंत आरोपीने सतत शारिरीक व मानसिक छळ केला. विवाहबाह्य संबंध ठेवून फिर्यादीसोबत वारंवार अनैसर्गिक संबंध केला. आरोपीने त्यांच्या 5 वर्षाच्या मुलासमोरही फिर्यादीशी अनैसर्गिक संबंध केला.
सर्विस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी
दरम्यान 2015 मध्ये आरोपीने नवी मुंबई येथील राहत्या घरात फिर्यादीवर सर्विस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यामध्ये फिर्यादीच्या बोटाला जखम झाली. आरोपीच्या दबावामुळे फिर्यादीने इतके दिवस पोलिसात तक्रार दिली नाही. परंतु, लग्नाची नोंदणी करण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.