Pune Crime : कारागृह अधीक्षकाच्या मुलाची पुण्यात हत्या; तरुणीसह पाच जण ताब्यात, घटनेनं खळबळ
Pune Murder News : चार पुरुष आणि एका तरुणीने गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
Pune Crime : पुण्यात एका युवकाच्या हत्येच्या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. गिरीधर गायकवाड (giridhar gaikwad) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल घडली असून गिरीधर गायकवाडच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हत्या झालेला गिरीधर गायकवाड हा अमरावती कारागृहाचे अधीक्षक उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा आहे. पुण्यातील हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरवरील मैदानात ही घटना घडली.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलरचा मुलगा असलेला 21 वर्षीय गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ हे एकाच कॉलेजमध्ये शिकतात आणि एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. साक्षी पांचाळचा प्रेमविवाह झालेला असूनही ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी राहत होती. तिचा नवरा काल तिला भेटायला आला असता त्याला साक्षी पांचाळच्या मोबाईलमध्ये गिरीधर गायकवाडचे फोन रेकॉर्ड दिसले.
त्यानंतर साक्षी पांचाळच्या नवऱ्याने तिला गिरीधर गायकवाडला फोन करुन बोलावून घ्यायला सांगितले. साक्षी पांचाळने गिरीधर गायकवाडला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले. यावेळेस साक्षी पांचाळ तिचा नवरा, नवर्याचे दोन मित्र आणि साक्षीचा भाऊ असे पाच जण तिथं होते. त्यावेळी गिरीधर गायकवाडवर हल्ला करण्यात आला. ज्यात गिरीधरचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी साक्षी पांचाळ आणि तिच्या भावाला कालच ताब्यात घेतलं आहे. तर इतर साथीदारांचा शोध सुरु होता. त्यानंतर पळालेल्या अन्य तीन आरोपींसह एकूण पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गिरीधरच्या मोबाईलवर काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला. तिला भेटून येतो असं सांगून घरातून गेल्यावर बराच वेळ तो परतला नाही. त्यानंतर अगदी काही मिनिटांनी अमरावतीला जेलर असलेल्या वडिलांना घरी फोन केला आणि ग्लायडिंग सेंटर येथील मैदानात गिरीधर याची हत्या झाल्याचे सांगितले. तिथे पोलीस गेल्यावर गिरीधर याचा मृतदेह असल्याची ओळख पटली.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, चार पुरुष आणि एका तरुणीने गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर सासवडच्या दिशेने पळून गेले असल्याचे सांगितले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली आहे.