Dharashiv Crime: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण, पैलवान अंगावर धावून गेला अन्...
Nilesh Ghaiwal attack: कुस्तीच्या फडातच टाकला डाव, पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवरील हल्ल्याचा VIDEO समोर. निलेश घायवळ याच्यावर झालेल्या हल्ल्याने खळबळ माजली आहे.

Nilesh Ghaiwal Attack: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून केला. या पैलवानाने निलेश घायवळ याला मारहाण केल्याचे समजते. त्याने निलेश घायवळच्या श्रीमुखात लगावली. मात्र, आजुबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचे समजते. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.
निलेश घायवळ याच्या अंगावर पैलवान धावून आला तेव्हा तो आणि आयोजक हे आखाड्यात पैलवानांची भेट घेत होते. यावेळी प्रसिद्ध कुस्तीपटू थापाची कुस्ती सुरू असल्याने कुस्तीच्या मैदानाजवळ कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा घेत संबंधित पैलवानाने अचानक निलेश घायवळवर हल्ला करण्यात आला. निलेश घायवळ याच्यावर हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, अशाप्रकारे एका कुख्यात गुंडावर भरमैदानात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवल्या जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहे. हे सर्वजण कुस्तीच्या फडात पहिलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी समोरच उभ्या असलेला पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. या पैलावानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारली. त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता. मात्र, घायवळ गँगमधील सहकारी या पैलवानावर तुटून पडले. त्यांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे कु्स्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुन्हेगार निलेश घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
आणखी वाचा
























