Nashik Police : महिला सुरक्षिततेबाबत गुंडाविरोधी पथकाची धडक मोहीम; 12 टवाळखोरांवर कारवाई
Nashik Police : मुली-महिलांची छेडखानी, टवाळखोरांचा उपद्रव, चोऱ्या-माऱ्या टाळण्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने वेगवेगळ्या बसस्थानकांवर धडक कारवाई केली.
Nashik Police नाशिक : मुली-महिलांची छेडखानी, टवाळखोरांचा उपद्रव, चोऱ्या-माऱ्या टाळण्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने वेगवेगळ्या बसस्थानकांवर धडक कारवाई केली. यावेळी महिलांसह मुलींना सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात आले. या कारवाईचे प्रवाशांसह सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ही कारवाई सतत सुरु ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी आणि नोकरीनिमित्त येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेडखानी टाळण्यासाठी बसस्थानकांमध्ये गुंडाविरोधी पथकाला तैनात करण्यात आले आहे.
महिला, मुलींचे केले प्रबोधन
प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सीबीएस, ठक्करबाजार आणि महामेळा (मध्यवर्ती बसस्थानक गाठून महिला-मुलींचे प्रबोधन केले. यावेळी नियमीत प्रवास करणाऱ्या विद्यार्थीनी तसेच महिलांकडून बसस्थानकातील अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच टवाळखोरांना पिटाळून लावले.
12 टवाळखोरांवर थेट कारवाई
यावेळी विद्यार्थिनींना गुंडाविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदारांचे मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणत्याही अडचणीच्या काळात संपर्क साधण्याचे तसेच तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बसस्थानकात विनाकारण फिरणाऱ्या 12 टवाळखोरांवर थेट कारवाई करण्यात आली. पोलीसांची चाहूल लागताच काही टवाळखोरांनी धूम ठोकली.
चोऱ्या-माऱ्यांनाही चाप बसणार
या कारवाईचे पालकवर्गासह बस प्रशासन, महिला मुली आणि प्रवाशांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यामुळे बसस्थानकातील चोऱ्या-माऱ्यांनाही चाप लागेल, असा विश्वास प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आला. तसेच अशा प्रकारच्या धडक कारवाया कायमस्वरूपी सुरु ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, डी. के. पवार, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, सावकार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, गणेश भागवत, गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड आदींनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या