(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : वर्षभरापूर्वी पदोन्नती, विशेष सुरक्षा विभागाच्या यादीत निवडही; उपनगरचा एपीआय गजाआड
Nashik Crime : वर्षभरापूर्वी पदोन्नती मिळालेल्या नाशिकमधील (Nashik) सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात लाचखोरी जोरात असून सातत्याने कारवाई होत असताना अधिकारी वर्ग मात्र लाच घेताना कचरत नसल्याचे नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनातही लाचखोरीने ऊत आणला आहे. अशातच वर्षभरापूर्वी पदोन्नती मिळालेल्या नाशिकमधील (Nashik) एका सहाय्यक पोलीस निरीक्षकास (API) लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) खाबुगिरी चांगलीच वाढली असून शिपायापासून ते उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत लाच घेण्यात येत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) सातत्याने महसूल, कृषी, पोलीस प्रशासनांतील अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचे सत्र सुरु आहे. अशातच नाशिक पोलीस प्रशासनातील सहायक पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात संशयिताविरुद्ध सामान्य दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मोबदल्यात त्याच्या भावाकडून 7 हजार रुपयांची लाच घेताना उपनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत (Bribe) प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रंगेहाथ पकडले. सन 2022 मध्ये या अधिकाऱ्याला एपीआयपदी पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्याचा समावेश होता.
सागर गंगाराम डगळे असे लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. उपनगर येथे 24 वर्षीय तरुणाविरोधात नात्यातीलच 16 वर्षीय मुलीचे प्रेमसंबंधातून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानुसार उपनगर पोलिसांनी जळगाव येथून संशयिताला अटक होती. आता तो जामिनावर असून, त्याच्याविरोधात कठोर दोषारोपपत्र दाखल करणार नाही आणि गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून डगळे, याने संशयिताच्या भावाकडे 25 हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार आणि संशयिताचा भाऊ खासगी ड्रायव्हर असून, आर्थिक परिस्थिती नसल्याने डगळे याला लाचेचे 2 हजार रुपये पूर्वी फोन पे केले.
दरम्यान, उर्वरित 23 हजार रुपये उकळण्यासाठी डगळे याने सतत संपर्क केला. त्यानुसार ठरला. त्यानुसार डगळे याने सात हजारांची लाच घेण्यासाठी संशयिताच्या भावाला नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि पुणे रोडवर बोलावून घेतले. तत्पूर्वी त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ डगळे याने लाच स्वीकारली असता त्याला पकडण्यात आले. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सूचनेवरून पोलीस निरीक्षक अनिल बागूल आणि पथकाने ही कारवाई केली.
काही महिन्यांपूर्वी बढती
सागर डगळे हा लाचखोर पोलीस अधिकारी नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्यातील बिटको पोलीस चौकी या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी या पोलीस अधिकाऱ्याची उपनिरीक्षक पदावरून बढती होऊन सहायक पोलीस निरीक्षक पदी निवड झाली होती. मात्र सात हजारांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे. मात्र अनेक कारवाया होऊनही प्रशासनातील अधिकारी लाच घेताना मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.