महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर मिहीरचा वडिलांना फोन, नंतर नॉट रिचेबल; गर्लफ्रेंडला मित्राच्या घरी जातो सांगून पळाला!
Worli Hit And Run: 24 वर्षीय मिहीर शहा देखील व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे.
Worli Hit And Run मुंबई: मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात (Worli Hit And Run) बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडण्याच्या प्रकरणात मिहीर शहा (Mihir Shah) हे नाव समोर आलं आहे. आरोपी मिहीर शहा हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. राजेश शहा (Rajesh Shah) यांना अटक करण्यात आली आहे. मिहीर शहाचा शोध मात्र पोलीस घेत आहेत. याचदरम्यान आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मिहीर शहा याने अपघातानंतर कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली आणि वडील राजेश शाह यांना फोन करून घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केल्याची माहिती समोर येत आहे. मिहीर शहा सकाळी 8 वाजेपर्यंत गोरेगावमध्ये प्रेयसीच्या घरी थांबला. बातम्या सुरू होताच तेथून मित्राच्या घरी जातो सांगून निघाल्याचं सांगण्यात येत आहे.
आरोपी दारूच्या नशेत-
24 वर्षीय मिहीर शहा देखील व्यावसायिक आहे. तो दारूच्या नशेत असताना हा अपघात घडल्याचा संशय आहे. तो रात्री जुहू येथील एका बारमध्ये मित्रांसह दारू पार्टीसाठी गेला होता. बारमधून निघाल्यावर तो गोरेगावला गेला. मिहीर फरार झाल्यामुळे तो दारूच्या नशेत होता की नाही, याबाबत निश्चित काही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोणत्या कलमान्वये झाला गुन्हा दाखल?
धरती हिंट अॅण्ड रन प्रकरणात पोलिसांनी कलम २०५, २८९, १२५ (ब), २३८, ३२४ (४) भारतीय न्याय संहितासह कलम १८४, १३४(अ), २३४ (ब), १८७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
अपघात कसा झाला?
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केलं.