Nashik Crime News : घोटी परिसरात सशस्त्र दरोडा; दहा तोळे सोन्यासह लाखाची रक्कम पळवली!
Nashik Crime News : इगतपुरी तालुक्यात घोटी शहरातील सिन्नर हायवेजवळ अज्ञात हल्लेखोरांनी घरावर हल्ला करत तब्बल 10 तोळे सोनं आणि एक लाख रक्कम चोरी केली आहे.
Nashik Crime News : नाशिकमधील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील घोटी शहरातील सिन्नर हायवेजवळ (Sinnar highway) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणारे रहिवासी श्रीकांत भदे यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करत तब्बल 10 तोळे सोने आणि एक लाख रुपयांचा दरोडा घालण्यात आला आहे. या घटनेने घोटी शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दहा तोळे सोन्यासह एक लाखांची रक्कम पळवली
घोटी (Ghoti) गावाजवळ श्रीकांत भदे यांचे घर असून काल रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान परिसर झोपेत असताना अज्ञात दरोडेखोरांनी भदे यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात दरोडेखोरांनी भदे यांच्यासह वडील जयवंत भदे आणि आई अलका भदे यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर दरोडेखोरांनी घरातील तब्बल दहा तोळे सोने आणि एक लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेली आहे. मारहाणीनंतर दरोडेखोरांनी ऐवज लुटून पळ काढला.
दोन्ही घरातील ऐवज लुटून नेला
दरम्यान, मारहाणीनंतर भदे कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. यानंतर लुटीची घटना निदर्शनास आली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी आपला मोर्चा सिन्नर हायवेलगत असलेल्या जावेद खान यांच्या घरावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. यात दरोडेखोरांनी खान यांच्या डोक्यावर तलवारीने वार करत त्यांना जखमी केले. दरोडेखोरांनी दोन्ही घरातील ऐवज लुटून नेला.
दरम्यान, भदे आणि खान या दोन्ही कुटुंबातील जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, एवढया मोठ्या सशस्त्र दरोड्यांनंतर घोटी गावासह आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
Nashik News : नाशिक बस दुर्घटनेनंतर पोलीस अॅक्शन मोडवर, 24 तासांत 31 बसेसवर कारवाई, 76 हजारांचा दंड