(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन ठिकाणी कारवाई, 8 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
Nanded News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल रात्री दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये 8 लाख 80 हजार 250 रुपयांची बनावट देशी दारुचा साठा आणि चारचाकी वाहने तसंच इतर साहित्यासह मुद्देमाल जप्त केला.
Nanded News : नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी बनावट मद्य येत असल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. परंतु आता बनावट दारु माफियांनी आपला मोर्चा देशी दारुकडे (Country Liquor) देखील वळवला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल (15 नोव्हेंबर) रात्री दोन ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये 8 लाख 80 हजार 250 रुपयांची बनावट देशी दारुचा साठा आणि चारचाकी वाहने तसंच इतर साहित्यासह मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईने बनावट दारु माफियांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला
नांदेड (Nanded) शहरातील नमस्कार चौक ते माळटेकडी उड्डाणपूल मार्गावर काल रात्री चारचाकी वाहनाने बनावट देशी दारु येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने, किनवट येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आणि नांदेडचे दुय्यम निरीक्षक पथकाने सापळा लावला. ज्यात 7 लाख 64 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय आठ आरोपींना अटक करण्यात आली. तसंच दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलं. यामध्ये 60 बॉक्स बनावट देशी दारु (भिंगरी संत्रा) तपासणीमध्ये आढळून आली. या दरम्यान भगीरथसिंह दयालसिंह सोहा, रा. धुलिया राजस्थान, प्रितेश गोविंद बाडेकर, रा. नांदेड यांना अटक केली आहे.
दुसऱ्या कारवाईत 1 लाख 15 हजार 800 रुपयांचा बनावट देशी दारु साठा जप्त
तर दुसऱ्या घटनेत बनावट देशी दारु कारखान्याचा भांडाफोड केला. नांदेड शहरातील चिखलवाडी परिसरातून जसपालसिंघ गुरुचरणसिंघ संधू यांच्या कारखान्यावर छापा टाकून 30 बॉक्स बनावट देशी दारुसाठा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 1 लाख 15 हजार 800 रुपये आहे. बनावट मद्य साठा ठेवणारा आणि पुरवणारा आरोपी प्रितेश गोविंद वाडेकर (रा.नांदेड), आकाश श्याम जाधव, (रा. बीड) याला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित आरोपीची कसून चौकशी केली असता त्यांच्या माहितीवरुन बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी येथील शेतामध्ये जाऊन छापा टाकला. यावेळी बनावट देशी दारु बाटलीत भरण्याकरता वापरण्यात आलेल्या मशीन, बनावट देशी दारुच्या बाटल्यांचे बूच, सीलबंद करण्याकरता वापरण्यात आलेली मशीन, 90 मिली. क्षमतेच्या 350 रिकामे कागदी खोके आणि मोबाईल फोन, चारचाकी वाहने आदी साहित्य जप्त करण्यात आलं. आकाश श्याम जाधव, विजेशकुमार भुराराम सैनी, गोविंद राजेंद शर्मा तर बनावट देशी दारुचे साहित्य पुरवणारे आसिफ रमजान तांबोळी हा आरोपी घटना स्थळावरुन फरार झाला आहे. या दोन्ही कारवाईत 7 लाख 64 हजार 450 रुपयांचा साठा आणि वाहन जप्त करण्यात आलं आहे.