Nagpur Crime News : चोरट्यांचा चक्क पोलिसांच्या स्मार्ट ट्रॅफिक बूथवर डल्ला; लाखोंचे साहित्य लंपास, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या
Nagpur : नागपूर शहरातील तीन स्मार्ट ट्रॅफिक बूथमधून चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केलाय. ट्रॅफिक बूथमधील चोरीमुळे पोलीस विभागतही खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय.
![Nagpur Crime News : चोरट्यांचा चक्क पोलिसांच्या स्मार्ट ट्रॅफिक बूथवर डल्ला; लाखोंचे साहित्य लंपास, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या Nagpur Crime News Theft at the police station in nagpur checkpoint Three arrested by Nagpur police maharashtra marathi news Nagpur Crime News : चोरट्यांचा चक्क पोलिसांच्या स्मार्ट ट्रॅफिक बूथवर डल्ला; लाखोंचे साहित्य लंपास, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/9ed6c3311f329053f0712f99a8247a211715002758819892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur Crime News नागपूर : उपराजधानी नागपुरातील वाढत्या गुन्हेगारी दरम्यान आता पोलीस (Nagpur Police) खातेही चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. त्यामागील कारण म्हणजे शहरातील तीन स्मार्ट ट्रॅफिक बूथमधून चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल लंपास केलाय. ट्रॅफिक बूथमधील चोरीमुळे पोलीस विभागतही खळबळ निर्माण झाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहनगर असलेल्या नागपुरात गुन्हेगारीचा (Crime News) आलेख सातत्याने वाढत आहे. चोरी, दरोड्याच्या घटना आता सर्रास झाल्या असून, दररोज हत्या, खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत. अशातच आता शहरात चोरट्यांचे प्रमाण इतके आहे की, चोरट्यांच्या नजरेतून कोणतीही मालमत्ता सुरक्षित नाही असेच चित्र निर्माण झाले आहे. तर आता हद्द एवढी आहे की या चोरट्यांची नजर वाहतूक पोलिसांच्या चौकीवरही पडली आहे.
चक्क ट्रॅफिक पोलिसांच्या स्मार्ट बूथमध्ये चोरी
नागपुरातील तीन स्मार्ट ट्रॅफिक बूथमधील चोरीचे वृत्त समोर आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या एलआयसी चौक, लिबर्टी चौक आणि व्हीसीए चौकात बांधलेले स्मार्ट ट्रॅफिक बूथ चोरट्यांनी फोडले. येथे चोरट्यांनी लाऊडस्पीकर, इन्व्हर्टर बॅटरी, ॲम्प्लीफायर आदींसह हजारो रुपयांचा ऐवज पळविला होता. आता या स्मार्ट ट्रॅफिक बुथ चोरीच्या प्रकरणात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी संशयित आरोपींकडून अडीच लाख रुपयांचा मालही जप्त केला आहे. सर्व संशयित आरोपी कट्टर गुन्हेगार असून, या संशयीतांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत.
तिघांना ठोकल्या बेड्या
नागपूर शहरातील सर्व चौकाचौकात स्मार्ट वाहतूक पोलीस बूथ बसविण्यात आले आहेत. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बुथमध्ये स्वयंचलित लॉक सिस्टीम आहे. कोड टाकल्यानंतरच या बूथमध्ये प्रवेश करणे शक्य होणार आहे. शहरातील सहा ठिकाणी आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले बूथ फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा माल चोरून नेला. चोरीचा प्रकार उघडकीस येताच पोलीस दलात गोंधळ पसरला. त्यानंतर या घटनेची दखल पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून परिसरातले सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे या चोरीच्या घटना करणाऱ्या तीन संशयित आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)