(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; 29 गुरांची सुटका, लाखोंचा मुद्देमाल जप्त
Nagpur Crime News : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तीन छोट्या वाहनांसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
Nagpur News नागपूर : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांच्या (Nagpur News) पथकाने मोठी कारवाई केली आहे. गुरांची अवैध वाहतूक (Cow Smuggling) करणाऱ्या तीन छोट्या वाहनांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी (Police) तीनही वाहनांमधील एकूण 29 गुरांची सुटका केली. संशयित आरोपींकडून एकूण 16 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
29 गुरांची सुटका
अब्दुल शाहिद अब्दुल रफिक (24, रा. मोमीनपुरा, नागपूर) आणि जाहीर खान बब्बू खान (34, रा. कामगार नगर, नवीन कामठी) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघे वाहनचालक आहे तर यांच्यातील एक संशयित आरोपी पळून गेला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कामठी शहरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कामठी (जुनी) पोलिसांच्या पथकाने संशयित वाहनांची अडवणूक करून पाहणी केली. दरम्यान, शहरातील कमसरी बाजार परिसरात एमएच-30-बीडी-3996, एमएच-28/डीबी-4998 आणि एमएच-40 बीएल-9182 क्रमांकाची वाहने अडवून झडती घेतली असता त्यातील दोन वाहनांमध्ये प्रत्येकी 10 प्रमाणे 20 आणि तिसऱ्या वाहनामध्ये 9, अशी एकूण 29 गुरे कोंबल्याचे आढळून आले.
एकूण 16 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
चौकशी दरम्यान यातील सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी दोन वाहनांच्या चालकांना अटक केली. तर एकाला पळून जाण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून तीन वाहने आणि 29 जनावरे असा एकूण 16 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार दीपक भिताडे, पोलिस उपनिरीक्षक रमेश दुबाळे, दिलीप ढगे, श्रीकांत विष्णूकर, प्रमोद शेळके, अमित पाझरे यांच्या पथकाने केली.
समृद्धी महामार्गावर गो तस्करीचं प्रकरण
काही दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गावर गो तस्करीचं प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या होत्या. या घटनेनंतर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रकरणी हिंगणामध्ये ट्रकचालकासह दोन जण ट्रक सोडून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. अशातच आता नागपूर पोलिसांच्या पथकाने जबलपूर-नागपूर महामार्गावर गो तस्करीचं प्रकरण समोर आणले आहे.