Nagpur Crime : खेळणं देण्याचं दाखवलं आमिष, दोन चिमुकलींना घरात घेऊन गेला अन्...; नागपूरमधील धक्कादायक घटना
Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील दिघोरा गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्याच्या (bhiwapur Taluka) दिघोरा गावात एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र पसारेने काल दुपारी घरासमोर खेळत असलेल्या 8 वर्षीय दोन मुलींना खेळणं देतो, असे आमिष दाखवून शेजारीच असलेल्या आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींसोबत अश्लील कृत्य करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे घाबरून एक मुलगी बाहेर पळून गेली.
विनयभंग करणाऱ्या नराधमास अटक
तर दुसरी चिमुकली तिथेच अडकली. तिच्या सोबत आरोपीने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक छेडखानी केली. नंतर पीडित मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडितेचे घर गाठून सर्व माहिती जाणून घेतली आणि त्यांना तक्रार देण्यासाठी हिंमत दिली. अखेर संध्याकाळी उशिरा कुटुंबीयांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार
दरम्यान, नागपूरमधील तीन आठवड्यांपूर्वी देखील अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. एका अकरावीतील विद्यार्थिनीचे स्कूलव्हॅन चालक गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता. त्याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीला दहशतीत ठेवले होते. तसेच वारंवार विद्यार्थिनीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. स्कूलव्हॅन चालकाचा त्रास सहन न झाल्यामुळे विद्यार्थिनीने कुटुंबियांना आपबिती सांगितली. यानंतर अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन स्कूल व्हॅनचालकाला अटक केली. गिरीश रामटके असे आरोपीचे नाव आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या