(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मालकावरचा राग त्याच्या मुलीवर काढला अन् थेट अपहरणाचा कट रचला; पोलिसांनी दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या
Crime News : मालकावरचा राग त्याच्या मुलीवर काढला अन् थेट अपहरणाचा कटच रचला. पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या.
Nagpur Crime News : नागपूर : शेतीचे पैसे दिले नाही म्हणून घरकाम करणाऱ्या नोकर दाम्पत्यानं मालकाच्या मुलीचंच अपहरण (Kidnapped) केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात (Nagpur) घडला आहे. नागपूर जिल्ह्यातील लोणार येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी (Nagpur Police) तात्काळ पावलं उचलली आणि मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही तासांतच पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि मुलगी सुखरुप सापडली. अपहरण कर्त्यांकडून मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली असून मुलीला आपल्या पालकांकडे सोपवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सारणी येथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नागपुरात राहणारे केशव आर्य यांच्या शेतावर गेल्या आठ महिन्यांपासून एक दाम्पत्य काम करत होतं. हे दाम्पत्य मूळचं मध्य प्रदेशात राहणारं होतं. पण कामाच्या शोधात नागपुरात आलं होतं. कामाच्या शोधात लोणार येथे आलेल्या दाम्पत्याला केशव आर्य यांनी आपल्या शेतात काम दिलं. काही दिवस दाम्पत्यानं व्यवस्थित काम केलं, मात्र त्यानंतर दाम्पत्य आणि मालक यांच्यात सारखे वाद होऊ लागले. दोघांमध्ये मजुरीच्या पैशांवरुन कायम वाद होत होते. आधी लहान सहान गोष्टींवरुन खटके उडू लागले. त्यानंतर मात्र वाद विकोपाला पोहोचला. त्यानंतर आपल्या मालकाला धडा शिकवण्यासाठी आणि त्याच्याकडून मजुरीचे पैसे उकळण्यासाठी नोकर दाम्पत्यानं थेट मालकाच्या मुलीच्याच अपहरणाचा कट रचला.
प्रकरण नेमकं काय?
या प्रकरणातील आरोपी हे मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी असून नागपूरच्या लोणार येथील केशव आर्य यांच्या शेतावर मागील आठ महिन्यांपासून काम करायचे. मात्र गेल्या काही काळापासून या दोघांमध्ये मजुरीच्या पैशांवरून कायम वाद होत होते. काही दिवसांतच वाद विकोपाला गेला. चक्क मजूर दाम्पत्यानं केशव आर्य यांच्या 12 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट रचला. व्यवस्थित प्लॅनिंग करुन मुलीचं अपहरण केलं आणि थेट मध्य प्रदेशात पळ काढला. या प्रकरणात केशव आर्य यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला. अपहरणकर्त्यांनी मुलीचं अपहरण करुन थेट मध्य प्रदेशात पळ काढल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी थेट मध्य प्रदेश गाठलं आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अपहरणकर्ते सोनू आणि त्याची पत्नी गीता दोघांचा शोध लागला. या दोघांना मध्य प्रदेशाच्या सारणी येथून अटक करण्यात आली. आरोपींसोबत आर्य यांची 12 वर्षांची मुलगी सुखरुप सापडली. पोलिसांनी याप्रकरणी दाम्पत्याला अटक केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मटण खाऊन आलास, म्हणून भारत फायनलमध्ये हरला, लहान भावाची हत्या, महाराष्ट्र हादरला!