Mira Road Crime : त्यानं आधी तुकडे केले, मग कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरला बारीक केले; देश हादरवणारी क्रूर, भयावह 'मिरारोड मर्डर मिस्ट्री'
Mira Road Crime : मीरा-भाईंदरच्या या घटनेनं पुन्हा एकदा देश हादरुन गेला आहे.
Mira Road Crime News: दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर (Shraddha Walkar Case) मुंबई (Mumbai News) जवळच्या मिरारोडमध्ये (Mira Road Crime) ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीनं लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवले. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपीनं हत्येसाठी वापरलेलं सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.
मीरा-भाईंदरच्या या घटनेनं पुन्हा एकदा देश हादरुन गेला आहे. मीरा-भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीच्या 'जे' विंगमधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही निर्घुण घटना घडली. या इमारतीतील घरात मनोज साने (वय 56) आणि त्याची लिव इन पार्टनर मयत सरस्वती वैद्य (वय 32) हे दोघे राहत होते. 2017 पासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं जास्त कुणाशी बोलत नव्हतं. सोसायटीच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होत नसे.
दोघेही सकाळी मॉर्निंग वॉकला जातना दिसायचे. तसेच, संध्याकाळी बाहेर आल्यावर सोसायटीच्या परिसरातील कुत्र्यांना बिस्किट वैगेर खाऊ घालायचे. सोसायटीच्या सेक्रेटरींनी सांगितल्याप्रमाणे, मनोज बोरीवली येथे दुकानात काम करायचा. तर सरस्वती ही घरीच असायची. दोघेही ज्या खोलीत राहत होते. ती खोली मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या मालकिच्या सोनम बिल्डर या कंपनीची आहे. आपण मनोजला भाड्यानं रुम दिला असून, याबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी केल्या असल्याचं गीता जैन यांनी सांगितलं आहे.
विकृत मनोजनं लिव इन पार्टनर सरस्वतीची हत्या 4 जून रोजी केली होती. हा नराधम सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट तब्बल तीन दिवस लावत होता.
हादरवणाऱ्या मर्डर मिस्ट्रीचा खुलासा नेमका झाला कसा?
इमारतीत राहणाऱ्या शेजारांना मनोज आणि सरस्वती राहत असलेल्या खोलीमधून दुर्गंधी येऊ लागली. शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली आणि नयानगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. नयानगर पोलीस सायंकाळी आठच्या सुमारास घरात प्रवेश केला, त्यावेळी या भयानक घटनेचा खुलासा झाला. घटनास्थळावरुन आरोपी मनोज साने याला ताब्यात घेतलं. पोलिसांसोबत काही तक्रारदार शेजारीही घरात गेले होते. त्यावेळी तीन बादल्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते. सोबतच झाडं कापण्यासाठी वापरण्यात येणारी कटर मशीनही होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, नयानगर पोलिसांनी मनोज साने याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला अटकही केली आहे.
मनोज आणि सरस्वती कसे भेटले?
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज साने आणि मृत सरस्वती वैद्यचं अधूनमधून किरकोळ कारणावरुन भांडण होत होतं. मनोज हा पूर्वी बोरीवली येथे राहत होता. 2014 पासून तो बोरीवलीच्या एका रेशनिंग दुकानात काम करायचा. तिथेच त्याची सरस्वतीशी ओळख झाली. सरस्वती ही बोरीवलीच्या अनाथालयात होती. तिचे आई-वडील नाहीत. तर मनोजचेही आई-वडील नाहीत. बोरीवली येथे त्याचे चुलते राहतात. मनोजनं 2017 साली मिरारोडच्या गीता आशादिप येथे रुम भाड्यानं घेतला होता आणि तिथे दोघे लिव इन रिलेशिनशिपमध्ये राहत होते.
हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजनं काय केलं?
सगळं चांगलं चाललेलं मात्र या दोघांत मध्यतंरी किरकोळ कारणावरुन भांडण होत होती. त्यात 29 जून 2023 पासून मनोजचं रेशनिंग दुकानाचं काम बंद झालं होतं. तो घरीच होता. दिनांक 4 जून रोजी सकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. यातून मनोजनं सरस्वतीची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मनोजनं झाड कापण्याची कटर मशीन घेऊन आला. सरस्वतीच्या संपूर्ण शरीराचे तुकडे तुकडे केले. एवढंच नाही तर तिचं शीरही मनोजनं सोडलं नाही. त्यानं सरस्वतीच्या शीराचेही कटर मशीनच्या मदतीनं तुकडे केले. पोलिसांनी सध्या घटनास्थळावरुन मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
मनोजनं पोलिसांना काय सांगितलं?
आरोपी मनोजनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मृत सरस्वती वैद्य हिनं 4 जूनला विष पिऊन आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस आपल्याला कारणीभूत पोलीस ठरवतील या भितीनं त्यानं मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची ही शक्कल लढवली. मात्र पोलिसांनी प्रथमदर्शनी आरोपी विरोधात भादवि कलम 302 आणि 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीनं काही मृतदेहाचे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. त्या तुकड्यांचा शोधही पोलीस आता घेणार आहेत. पोलिसांनी रात्री उशीरा हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व सामान, तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे. सध्या या प्रकरणी अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळत आहेत. पोलिसांचा याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mira Road Crime: मिरारोडच्या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल; गृह विभागानं तातडीनं लक्ष देणं गरजेचं, पत्र लिहून अहवाल सादर करण्याचे निर्देश
- हॉलमध्ये कटर मशीन, बेडरूममध्ये काळं पॉलिथीन; मिरारोडच्या घरात काय पाहिलं? प्रत्यक्षदर्शीचा हादरवणारा अनुभव
- Mira Road Crime: इतकं निर्दयी कोणी कसं होऊ शकतं? हत्या करून लिव्ह इन पार्टनरचे तुकडे कुकरमध्ये अन् मिक्सरमध्ये...