(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News : रील्सवरून मुंबई पोलिसांना चॅलेंज; बस्तान बसण्याआधीच मस्तान गँगचा म्होरक्या गजाआड
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांना रील्सवरून अटक करण्याचे आव्हान देणाऱ्या एका गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत. हा गुंड तडीपारीची शिक्षा संपण्याआधीच पुन्हा मुंबईत परतला होता.
Mumbai Crime News : सोशल मीडियावर रील्सवरून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) चॅलेंज करणाऱ्या एका तडीपार गुंडाच्या मुसक्या आवळल्या. आधीच्या गुन्ह्यात असलेली तडीपारीची शिक्षा संपण्याआधीच हा गुंड पुन्हा मुंबईत दाखल झाला होता. या गुंडाला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) सारखी आपली मस्तान टोळी तयार करायची होती. मात्र, पोलिसांनी या गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने न्यायाधीशाच्या मुलीबाबतही अपशब्द वापरले होते.
मुंबईत वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. शुक्रवारी एका मस्तान कंपनी गॅंगच्या तडीपार गुंडाने एमआयडीसी पोलिसांची झोप उडवली. या तडीपार गुंडाने तलवार घेऊन एक रील बनवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंधेरी मरोळ परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला. शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या ( 23 वर्ष ) असं अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी परिसरातील अहमद दाऊत चाळीत राहणाऱ्या शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या याच्यावर पंधरा पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये चोरी, घरफोडी, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे सारखा गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला एमआयडीसी पोलिसांनी तडीपार देखील केले होते. मात्र, तडीपारी संपण्याअगोदरच गुंड शहादा सलीम मुल्ला हा पुन्हा मरोळ परिसरात आला. हातात तलवार घेऊन एक रील बनवून पुन्हा पोलिसांना आव्हान देऊ लागला. हा व्हिडीओ व्हायरलही झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. खबऱ्याकडून एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले.
दाऊद प्रमाणे मस्तान गँग तयार करण्याचे स्वप्न
शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला दाऊद गॅंग सारखं मुंबईमध्ये पुन्हा मस्तान कंपनी नावाने गॅंग बनवून मुंबईत दहशत माजवायची होती. यासाठी त्याने मुंबईच्या मरोळ परिसरात दहशत देखील माजवण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने हातात तलवार घेऊन रिल बनवून न्यायाधीशाच्या मुलीला शिवीगाळ देखील केली होती. शिवाय पोलिसांना देखील अटक करण्याचे आव्हान दिले होते. मात्र, त्याचे भाई होण्याचे स्वप्न पोलिसांनी अटक करून भंग केले. त्याच्यावरील वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून त्याला तडीपार देखील करण्यात आले होते. मात्र पुन्हा तडीपारी संपण्याअगोदरच मरोळ परिसरात दहशत वाजवण्यासाठी पाऊल ठेवले. मात्र त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे.