(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Crime News: मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; भांडुप परिसरातून देशी बनावटीच्या बंदुकांसह दोन जणांना अटक
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Baba Siddique Murder Case: माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सदर घटना 12 ऑक्टोबर रोजी मुंबईती वांद्रे येथे घडली. या घटनेनंतर सदर प्रकरणातील एकूण 10 जणांना अटक केली असून मुंबई क्राइम ब्राँच याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील भांडुप परिसरातून दोन बंदुका आणि 6 जिवंत काडतुसेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही बंदुका देशी बनावटीच्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रथम एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे बंदूक सापडले. यानंतर चौकशीदरम्यान आणखी एका व्यक्तीची माहिती मिळाली, त्यानंतर त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी एक देशी बनावटीचे बंदूक सापडले. दोन्ही देशी बनावटीचे पिस्तूल या आरोपींना तिसऱ्या व्यक्तीने दिले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत शस्त्रे कुठून येत आहेत?, असा प्रश्न वरिष्ठांनी उपस्थित केला होता आणि गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना आणखी दक्षता वाढवण्यास सांगितले होते. यानंतर मुंबई पोलिसांकडून विविध चौकशी करण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक-
बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि मोहम्मद जिशान अख्तर यांना अटक करण्यात गुन्हे शाखेला अद्याप यश आलेलं नाही. यांच्या शोधासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. तर आतापर्यंत गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप, राम फुलचंद कानोजिया, हरिशकुमार निसाद, नितीन सप्रे, संभाजी पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी यांना अटक करण्यात आली आहे.
मला-माझ्या कुटुंबाला न्याय हवाय- झिशान सिद्दीकी
आमदार झिशान सिद्दीकी यांनी आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या भेटीनंतर झिशान सिद्दिकी यांनी 'माझ्या वडिलांनी गरीब, निष्पाप लोकांचे जीवन आणि घरांचे संरक्षण करताना जीव गमावला. त्यांचा मृत्यू व्यर्थ जाता कामा नये. तसेच त्याचं राजकारणदेखील होऊ नये. मला माझ्या कुटुंबाला न्याय हवाय, अशा मागणीची पोस्ट झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच काही दिवसांआधी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिशान सिद्दीकी यांची भेट घेत सदर तपासाबाबत योग्य ती माहिती दिली होती.