![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyber Crime : कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक
सहावी नापास असलेल्या 20 वर्षीय युवकाने कॅनडात नोकरी लावतो म्हणून अनेकांकडून लाखो रुपये उकळले आहेत. बांद्रा सायबर पोलिसांनी आरोपीला कोलकात्यात जाऊन बेड्या ठोकल्या.
![Cyber Crime : कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक Mumbai Bandra Cyber cell police arrested accused from Kolkata for Rs 15 lakh Jamtara style cheating for job in Canada Cyber Crime : कॅनडात नोकरी लावतो म्हणून 'जामतारा स्टाईल'ने महिलेस 15 लाखांचा गंडा, आरोपीला कोलकात्यातून अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/08/9d75502ff51c6a057e5710451dfc8284_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आपण आतापर्यंत 'जामतारा' फेक कॉलच्या अनेक सुरस कथा ऐकत आलो आहोत. बँकेचा मॅनेजर बोलतोय असं सांगत ठगांनी जामतारा स्टाईलने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. त्याच पद्धतीने कोलकात्यातील एक सहावी नापास 20 वर्षीय युवक फक्त ऐकून कॅनेडीयन, अमेरिकन स्टाईल इंग्रजी बोलायला शिकला आणि त्या जीवावर त्याने अनेकांना कोट्यवधींची गंडा घातल्याचं समोर आलं आहे. नुकतंच सायबर सेल पश्चिम विभागाच्या बांद्रा पोलिसांच्या एका टीमने थेट कोलकात्याला जाऊन या आरोपीला गडाआड केलं आहे.
मुंबईतील एका उच्च शिक्षित महिलेला कॅनडात नोकरी लावतो म्हणून तिच्याकडून तब्बल 15 लाख 20 हजार रुपये उकळल्याचा आरोप त्या आरोपीवर ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात फेसबुकवरच्या एका कंपनीच्या जाहिरातीला ही महिला भूलली आणि तिची 15 लाखांची फसवणूक झाली.
फेसबुकवरुन जाळ्यात
एमबीए झालेली गुजराती महिला कोरोना काळात नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी तिला फेसबुकवरुन एका कंपनीची माहिती मिळाली. दिलेल्या ई मेलवर मेल केल्यानंतर त्या महिलेला कॅनडामध्ये नोकरी, तिच्या वास्तव्याची व्यवस्था आणि तिकडे जाणेसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्राची पूर्तता करुन देण्याची खात्री देण्यात आली.
त्यांनी दिलेल्या संपर्कावर पत्ता साधल्यानंतर समोरुन कॅनेडियन ढबाच्या इंग्रजी भाषेतून संभाषण साधण्यात आलं. त्यामुळे त्या महिलेला अधिकच विश्वास बसला. त्या महिलेचे शिक्षण आणि कागदपत्रे पाहून आपण रिप्लाय दिल्याची खात्री देत मोबाईल नंबर शेअर करण्यात आला. कॅनडात सेल्स मॅनेंजरची नोकरी ऑफर करण्यात येणार असून त्यासाठी भारतात कोणताही खर्च नाही अशी खात्री देण्यात आली. त्या महिलेचा यावर इतका विश्वास बसला की तिने आपल्या बहिणीचीही शिफारस केली.
पैसे उकळण्यास सुरुवात
त्यानंतर रिया राय नावाच्या एका महिलेने संपर्क साधला आणि त्या महिलेकडून पासपोर्ट, फोटोग्राफ, बायोडाटा, वैद्यकीय अहवाल मागितला. त्यानंतर फी म्हणून दोघींचे प्रत्येकी 20 हजार रुपये मागितले. त्याची पूर्तता फिर्यादी महिलेने केली. काही दिवसांनंतर आरव मल्होत्रा या नावाच्या व्यक्तीचा कॉल करुन कॅनडाला जाण्यासाठी खर्च म्हणून प्रत्येकी 1,50,000 असे एकूण तीन लाख रुपयांची मागणी केली. त्या महिलेला देण्यात आलेल्या इस्तियाक अन्सारी या इसमाच्या एसबीआय खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतरही जवळपास आठ लाख रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी उकळले.
महिलेला संशय आला
कॅनडाला जाण्यास अडचण येत असून सिंगापूर मार्गे कॅनडाला जावं लागत असल्यानं आरोपींकडून त्यासाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी संबंधित महिलेला संशय आला. तिने ती रक्कम भरण्यास नकार दिला. त्यावेळी हेन्री जेम्स नावाच्या व्यक्तीने कॉल केला आणि आपण कॅनडातील कंपनीचा मॅनेंजर असल्याचं सागितलं. सांगितलेली रक्कम भरावी अन्यथा नोकरीची संधी जाईल असं त्यानं सांगितलं. त्यावर संबंधित महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.
कॅनडात नोकरी लावण्याच्या अमिषाने आतापर्यंत आपल्याकडून 15,20,000 रुपये उकळण्यात आल्याची तक्रार बांद्रा येथील पश्चिम विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांना आयपीसी कलम 419, 420, 34, 66 (क), 66(ड) या अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली.
बांद्रा पोलिसांचा तपास सुरु
फिर्यादीने जी माहिती पुरवली, अकाऊट नंबर ,मोबाईल नंबर त्यानुसार पोलिसांनी ती सर्व माहिती घेतली आणि त्यावर तपास सुरु केला. संबंधित अकाऊंटचे डिटेल्स काढले असता ते कोलकाता येथील निघाले.
आरोपीचे मोबाईल क्रमांक सुरु असल्याचं समोर येताच, त्याचे लोकेशन आणि कॉल डिटेल्स मिळवले आणि त्या मोबाईलच्या कॉल्सवर नजर ठेवली. त्या कामी सायबर पोलिसांची तांत्रिक मदत घेऊन आरोपीची वेगवेगळी माहिती घेण्यात आली.
झोन 9 चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे, बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता शिंदे, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांनी सूचना करुन पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिकेत कडू, पोलीस हवालदार कुशलानी, शिपाई संग्राम जाधव अशा चार लोकांची एक टीम तयार केली आणि त्यांना एक जुलैला कोलकात्याला पाठवलं.
संवेदनशील परिसरात आरोपीचे वास्तव्य
कोलकात्यात पोहोचल्यानंतर पार्कस्ट्रीट पोलिस स्टेशनशी संपर्क साधला असता मुंबई पोलिसांना समजलं की तो परिसर अत्यंत संवेदनशील आहे. त्या मुस्लिमबहूल परिसरात पोलिसांनी जाणं म्हणजे जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. पण घाबरतील ते मुंबई पोलीस कसले? उपनिरीक्षक अमित पांडेनी याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता शिंदे आणि पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांना दिली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांनी आपले मिशन पूर्ण करायचं ठरवलं.
चार तारखेला कोलकात्यातील पार्कस्ट्रीट पोलीस स्टेशनच्या मदतीने टार्गेट क्रमांक एक, ज्याच्या अकाऊंटवर आतापर्यंत 11 लाख रुपये पाठवण्यात आले होते, त्या इस्तियाक अन्सारीला अटक केली. टार्गेट क्रमांक दोन म्हणजे मुख्य आरोपी हा अॅन्टालिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा होता. त्या ठिकाणी तीन जणांची टीम गेली. पोलिसांना जो पत्ता मिळाला होता तो पत्ता कन्फर्म केला. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता ते ऑफिस बंद असल्याचं समजलं.
आरोपीला पकडण्यात यश आलं
पोलीस आरोपीच्या राहत्या ठिकाणी पाळत ठेऊन होते. पण बराच वेळ आरोपी आला नसल्याने पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकाला आरोपीला फोन लावायला भाग पाडलं आणि त्याला घरी बोलावलं. आरोपीचे नाव हे जफर असं असून तो केवळ 20 वर्षांचा युवक होता. जफर आल्यानंतर त्याला लगेच ताब्यात घेतलं.
दुसऱ्या दिवशी आरोपीला स्थानिक न्यायालयासमोर उभं करुन त्याच्या ट्रान्सिट रिमांडची मागणी केली. न्यायालयाने मुंबई पोलिसांची ही मागणी मान्य केली आणि आरोपीला त्यांच्या स्वाधीन केलं. 6 जुलै रोजी हावडा-मुंबई ट्रेनमधून दोन्ही आरोपींना घेऊन बांद्रा सायबर पोलिसांची ही टीम मुंबईत पोहोचली. मुंबईत पोहोचेपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. कारण आरोपीने या दरम्यान काही आगतीक केल्यास त्याची सर्व जबाबदारी पोलिसांवर होती.
या कामात पोलिसांना तांत्रिक सहकार्य सातत्यानं मिळत गेलं. या केसचा अभ्यास बांद्रा पोलिसांनी दोन महिने केला. एक टीम वर्क म्हणून या आरोपी पकडण्यात यश आलं.
सहावी नापास मुलगा आणि फेक कॉल सेंटर
जफर या सहावी नापास असलेल्या 20 वर्षीय मुलाने केवळ ऐकून इंग्रजी शिकलं. अमेरिकन आणि कॅनेडियन पद्धतीची फक्कड इंग्रजी तो सहजरित्या बोलतो. त्याच्या जीवावर त्याने देशभरातल्या अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला. आरोपीने त्याच्यावरील सर्व गुन्हे मान्य केले आहेत. त्याने वेगवेगळ्या नावांनी फिर्यादी महिलेला कॉल करुन तिच्याकडून 15,20,000 रुपयांना गंडा घातला.
अनेकांची फसवणूक
या महिलेने तक्रार केली म्हणून फसवणुकीची ही गोष्ट समोर आली. अशा कित्येक जणांना पाचशे रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळ्या या कोरोना काळात सक्रिय होत्या आणि आताही आहेत. फेसबुकवरुन एखाद्या व्यक्तीने काय पाहिले, कोणत्या प्रोडक्टची माहिती मिळवली याची सर्व माहिती घ्यायची आणि त्यानुसार त्याला जाहीराती पाठवायच्या, नंतर त्याला जाळ्यात ओढायचं हा प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहे. याला बळी पडलेल्या आपली काही हजारांची फसवणूक झालीय, किंवा आपण वेड्यात निघालोय असं जर लोकांना समजलं तर लोक हसतील या भीतीपोटी समोर येत नाहीत. मग अशा फसवणूक करणाऱ्या टोळक्यांचं फावतं.
त्यामुळे इंटरनेट जेवढं फायद्याचं ठरतं तेवढंच धोक्याचंही आहे, फक्त हा धोका वेळेपूर्वीच ओळखता आला पाहिजे. अन्यथा यामुळे अनेकांचं आयुष्य बरबाद झाल्याचं समोर आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)