Parbhani Crime : वाळू माफियांकडून शेतकऱ्याचा खून, 8 दिवस प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, स्वतः पोलीस अधीक्षकांनी गुन्हा नोंदवून घेतला
परभणीत वाळू उपशाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्याचा वाळूमाफियांनी खून केला. आर्थिक प्रलोभने दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु होता. हे कळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेत 8 जणांवर गुन्हा नोंदवला
परभणी : वाळू उपशाला विरोध करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी मारहाण करुन खून केल्याची घटना परभणीत घडली आहे. हे प्रकरण पैसे देऊन मिटवण्याचा प्रयत्न सुरु असताना, पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी पोलीस ठाण्यात बसून गुन्हा नोंदवून घेतला. या प्रकरणी श्रावण सोमेश्वर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आठ आरोपींविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू उपशाला विरोध करण्यामुळे एका तरुण शेतकऱ्याचा खून होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असावी.
माधव त्र्यंबक शिंदे (वय 41 वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. पालम तालुक्यातील रावराजूर येथील माधव शिंदे यांच्या आई ग्रामपंचायत सदस्या आहेत. रात्रीच्या वेळी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यास माधव विरोध करत होते. त्यामुळे प्रकाश प्रभू डोंगरे आणि धक्क्यातील भागीदारांची माधव शिंदे यांच्यावर खुन्नस होती. गुरुवारी 24 मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता सुरेश उत्तम शिंदे, ओमप्रकाश ज्ञानोबा शिंदे आणि माधव त्र्यंबक शिंदे हे दुचाकीवर बसलेले होते. गोदावरी नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्याने ते दुचाकीवरुन गेले. रस्त्यावर ठेकेदार प्रकाश सुभाष डोंगरे, भागीदार संदीप लक्ष्मण शिंदे, भगवान प्रकाश शिंदे, नितीन खंदारे, राजेभाऊ बोबडे, सर्जेराव शिंदे तिथे दिसले. त्या ठिकाणी रेती काढण्याचे काम सुरु होते. यावेळी माधव शिंदे यांनी रात्रीच्या वेळी वाळू नियमानुसार काढता येत नाही, असं सांगितलं. पण राजेमाऊ बोबडे यांनी "रेती उपसा बंद होणार नाही. तुला काय करायचे ते कर," असं म्हणत हातातील रॉडने माधव शिंदे यांच्या कमरेखाली मारहाण केली. त्यानंतर प्रकाश प्रभू डोंगरे यांनी "धक्क्यात एवढे पैसे घातले आहेत ते काढायचे कसे," असं म्हणत शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने पायाच्या मांडीवर मारहाण केली. नितीन खंदारे यांनी हातातील लोखंडी रॉडने शेतकऱ्याच्या पायावर मारहाण केली. याच मारहाणीत शिंदे हे गंभीर जखमी झाले. या वाळू माफियांनीच त्यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवले, मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर तब्बल आठ दिवस हे प्रकरण वाळू माफियांनी दाबण्याचा प्रयत्न केला. वाळू उपशाला विरोध करणार्या या शेतकऱ्याचा बळी पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या हफ्तेखोरीमुळे गेला. मृताच्या कुटुंबियांना आर्थिक प्रलोभनं दाखवून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरु होता. याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना लागताच त्यांनीच पुढाकार घेऊन आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला.