मानलं राव पोलिसांना! फक्त झाडाच्या पाल्यावरून लावला एटीएम चोरांचा छडा, पाहा काय आहे प्रकरण?
Crime News : एसबीआयचा एटीएम फोडून चोरी करणाऱ्या चोरांनी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी झाडाच्या पाल्यावरून आरोपींचा माग काढत अटक केली.
कळंब, उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब (Kalamb) शहरातील ढोकी रस्त्यावरील जत्रे कॉम्पलेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचा (State Bank Of India) एटीएम (ATM) तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेसह चोरांनी पळवल्याने खळबळ उडाली होती. या चोरांनी थेट एटीएम मशीनच पळवून नेल्याने या घटनेची मोठी चर्चा झाली. त्यामुळे पोलिसांना (Police) या चोरांना पकडून बेड्या ठोकण्याचे एक आव्हान होते. मात्र, म्हणतात 'कानून के हात बहोत लंबे होते है', त्याचप्रमाणे उस्मानाबाद पोलिसांनी अखेर या चोरांना बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे फक्त एका झाडाच्या पाल्यावरून पोलिसांनी या एटीएम चोरांचा छडा लावला आहे.
ढोकी रस्त्यावरील जत्रे कॉम्पलेक्स मधील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एटीएम (SBI ATM) तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेसह चोरांनी पळवून नेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कळंब पोलिसांच्या पथकाने इतर पोलिसांच्या मदतीने अवघ्या सहा दिवसांत आरोपीचा छडा लावत जालना जिल्ह्यातील परतूर येथून दोन आरोपींना अटक केली. परंतु, यातील आणखी तीन आरोपी व चोरीतील रक्कम पोलिसांच्या हाती लागलेली नाही. या दोन्ही आरोपींना कळंब पोलिसांनी बुधवारी कळंबच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
करंजी झाडाच्या पाल्यावरून आरोपी सापडले...
कळंबमध्ये झालेल्या एटीएम चोरी प्रकरणात पोलिसांकडून वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. याचवेळी पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली गाडी परभणीच्या सेलूत बेवारस अवस्थेत सापडली. दरम्यान, या बेवारस वाहनाच्या दृष्टीने तपास करत असतानाच याच गुन्ह्यात उस्मानाबाद पोलिसांना जालना जिल्ह्याची लिंक मिळाली. त्यामुळे एक पथक जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये दाखल झाले. पोलिसांनी परतुर परिसरातील काही दुकानामधील सीसीटीव्ही तपासात चौकशी सुरु केली. याचवेळी सेलूमध्ये सापडलेली गाडी सीसीटीव्हीत एका घरासमोर उभी दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्या घरासमोर जाऊन पाहणी केली असता, घरासमोर एक करंजीचं झाड दिसलं. विशेष म्हणजे पोलिसांना सापडलेल्या बेवारस गाडीत देखील पोलिसांना करंजी झाडाचा पाला मिळून आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी काही दिवस घरातील लोकांवर पाळत ठेवली असता काही संशयित गोष्टी दिसून आल्या. त्यामुळे पोलिसांनी संबंधित घरात छापा मारला असता घरात गुन्ह्यात वापरले जॅकेट, रोप वायर, फोडलेले एटीएमचे काही तुकडे मिळून आले आणि आरोपींचा छडा लागला.