पत्नीला मेव्हण्याकडे धाडलं, मग घोटला डॉक्टर मुलीचा गळा; शुभांगी हत्या प्रकरणात नवा खुलासा
Nanded Crime News: नांदेडमध्ये शुभांगी हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यात (Nanded District) गाजत असलेल्या महिपाल पिंपरी येथील डॉ. शुभांगी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता याच प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. दरम्यान 22 जानेवारी रोजी शुभांगीचे वडील जनार्दन जोगदंड यांनी शुभांगीचा गळा घोटण्यापूर्वी तिच्या आईला मामाकडे पाठविले होते. त्यानंतर शुभांगीचा खून करून तिचा शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. शुभांगीच्या आईला थेट शेतात अंत्यसंस्काराच्या वेळीच आणण्यात आले. यावेळी फक्त त्या माऊलीला शुभांगीचा चेहरा दाखवून, तिचे सरण पेटविण्यात आले. त्यामुळे मुलीच्या पित्यानेच आपल्या लेकीचा खून केल्याची साधी कुणकुणही आईला लागली नाही. या प्रकरणाचे बिंग फुटल्यानंतर शुभांगीच्या आईला धक्काच बसला आहे.
नांदेड पोलीस गेल्या आठवड्याभरापासून या प्रकरणाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करीत आहेत. शुभांगीचे गावातील नात्यात असणाऱ्या मुलाशी असणारे प्रेम प्रकरण कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळेच तिची (स्थळ निश्चित) सोयरीक करण्यात आली. परंतु शुभांगीच्या प्रियकराच्या डोळ्यांत ही सोयरीक खुपत होती, म्हणून त्याने नियोजित वराला आपल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. त्यामुळे शुभांगीची सोयरीक मोडली.
दरम्यान, गावात आपली बदनामी झाल्याचा राग तिचे वडील जनार्दन जोगदंड आणि भावाला होता. त्यातूनच त्यांनी शुभांगीचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. 22 जानेवारी रोजी शुभांगीच्या आईला गावातीलच मामाकडे पाठविले. त्यानंतर मध्यरात्री गाव सामसूम झाल्यानंतर शुभांगीचा गळा घोटण्यात आला. यावेळी शुभांगीची आई मामाकडे असल्याने तिला साधी कुणकुणही लागली नाही.
आईला फक्त शुभांगीचा चेहरा दाखविला
शुभांगीच्या हत्या केल्यावर काही वेळानंतर माध्यरात्रीलाच आरोपींनी शुभांगीचे प्रेत खताच्या पोत्यात भरून शेतात नेले. तर ज्वारीच्या पिकाच्या बाजूला चिकू आणि आंब्याच्या झाडांच्या ठिकाणी सरणही रचण्यात आले. सरणाला अग्नी देण्यापूर्वी शुभांगीचा मामा तिच्या आईला घेऊन थेट शेतात पोहोचला. यावेळी शुभांगीच्या वडिलांनी विजेवरील शेगडी पेटवित असताना शॉक लागून शुभांगीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईला सांगितले. तसेच अंत्यदर्शन घेण्यासाठी तिच्या आईला फक्त शुभांगीचा चेहरा दाखविला आणि आईला मुलीचे शेवटचे अंत्यदर्शनही पूर्ण होऊ दिले नाही.
आरोपी पत्नीला घेऊन शेतात राहत होता...
शुभांगीचे प्रेत जाळल्यानंतर तिची राख आणि हाडे शेतालगत असणाऱ्या कॅनलमध्ये फेकून देण्यात आली. तर अंत्यविधी केल्याच्या ठिकाणी नांगरून घेत, पाणीही सोडण्यात आले. आरोपींनी शुभांगीचा मृतदेह जाळल्यानंतर, गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. मात्र ही चर्चा शुभांगीच्या आईच्या कानावर पडू नये म्हणून, जनार्दन जोगदंड हे पत्नीला घेऊन शेतातच मुक्काम करत होते. दरम्यान, आपल्या लेकीचा पित्यानेच खून केल्याचा साधा संशयही शुभांगीच्या आईला आला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :