Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Beed News: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. एसआयटीने वाल्मिक कराड याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु असताना पोलीस दलाकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. परळीतील महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या खून प्रकरणाचा तपास आता परळी पोलिसांकडून काढून घेण्यात आला आहे. हा तपास आता पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. तसेच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder) तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) वाल्मिक कराड (Walmik Karad) याची मालमत्ता जप्त करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. एसआयटीने बीड विशेष न्यायालयात संपत्ती जप्त करण्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी परळीतील जगमित्र कार्यालयात एक बैठक बोलावली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात मेसेज पाठवण्यात आले आहेत. धनंजय मुंडे विविध विषयांवर मार्गदर्शन करणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी,विविध आघाडीचे पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, उद्या शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5:00 वाजता राज्याचे अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 'जगमित्र कार्यालय' येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असा मजकूर या मेसेजमध्ये नमूद करण्यात आला आहे.
बैठकीतील महत्वपूर्ण विषय
▪️राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन
▪️आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
▪️आरोग्य सहाय्यता कक्ष स्थापना
▪️मकर संक्रांत निमित्त महिलांसाठी कार्यक्रम
▪️त्यागमूर्ती माता रमाई जयंती
▪️शिवजयंती
▪️महाशिवरात्री यात्रा महोत्सव
वाल्मिक कराडची सिटी स्कॅन तपासणी
गेल्या काही दिवसांपासून पोलीस कोठडीत राहिल्यामुळे वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली होती. नुकतेच त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर आता वाल्मिक कराड याची सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर पोटदुखीचे उपचार सुरु आहेत. तपासणी करणाऱ्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार उपचाराची पुढील दिशा ठरणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस.बी.राऊत यांनी दिली.
धनंजय मुंडे सत्तेत असताना वाल्मिक कराडची चौकशी कशी होणार? आव्हाडांचा सवाल
मुंबईतील जनआक्रोश मोर्चात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य केले. धनंजय मुंडे यांना सत्तेत ठेऊन तुम्ही कराडची चौकशी करत आहात. असं कसं चालेल? मला कळत नाही की वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात? त्याच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्यामुळेच त्याला सगळे घाबरतात का?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. वाल्मिक कराड हा सध्या रुग्णालयात आरामात झोपला आहे. आता त्याला मोठे आजार होतील आणि तो मस्त आराम करेल. माझ सांगणं आहे की सोडूनच द्या ना त्याला, अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
आणखी वाचा