Crime in Nagpur : नागपूर हादरलं...अवघ्या काही तासात हत्येच्या दोन घटनांनी खळबळ
Nagpur Crime : दहा वर्षाचा मुलगा घरात पाणी भरत नाही, या रागातून वडिलांनी मुलाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे
नागपूर : अवघ्या काही तासात हत्येच्या दोन घटनांनी नागपूर हादरले आहे. दहा वर्षांचा मुलगा घरी पाणी भरत नाही, या कारणावरून वडिलांनी मुलाची हत्या केल्याची घटना नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरादेवी या ठिकाणी घडली आहे. हत्येची दुसरी घटना जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत बेझनबाग परिसरात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
दहा वर्षांचा मुलगा घरी पाणी भरत नाही म्हणून बापाने केली मुलाची हत्या
नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरादेवी परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गुलशन उर्फ गबरू मडावीची हत्या त्याच्याच दारुड्या बापाने केल्याचे समोर आले आहे. 22 मे रोजी सुरादेवी परिसरात एका झोपडीत गुलशन उर्फ गबरू मडावी या 10 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. गुलशनच्या मृतदेहावर आणि गळ्याभोवती खुणा असल्याने पोलिसांना गुलशनचे मृत्यू संशयास्पद वाटले. पोलिसांनी एसीपी संतोष खांडेकर आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वात सखोल तपास सुरु केले. अवघ्या काही तासातच गुलशनची हत्या त्याच्या वडिलानेच केल्याचे समोर आले. संतलाल मडावी असे निर्दयी बापाचे नाव असून संतलाल चाकू आणि कैचीला धार लावण्याचा व्यवसाय करतो. संतलालला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी चार वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. तेव्हापासून संतलाल दारू पिऊन दोन्ही मुलांना रोज मारहाण करायचा. रविवारी दुपारी गुलशनला घरी पाणी न भरल्यामुळे आरोपी बापाने प्रचंड मारहाण केली. एवढ्यावर त्याचे समाधान न झाल्याने त्याने घरात नेऊन त्याचा गळा आवळून हत्या केली. घटनेच्या वेळी मृतकची बहीण घराबाहेर गेली होती. कुणालाही काहीही कळू नये यासाठी संतलालन घराचे दार बंद करून मुलीला घेऊन बाहेर पडला आणि काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भाऊ महादूच्या घरी गेला. काही तासाने तो, त्याचा भाऊ, भावाची पत्नी आणि मुलगी हे सर्व घरी परतले. तेव्हा गुलशन कुठेच दिसून न आल्यामुळे त्याचा शोध सुरू करण्यात आला. पण मुलाची हत्या केली असून त्याचे मृतदेह घरात पडून आहे हे माहित असून सुद्धा संतलालने मुलाला शोधण्याचा बनाव केला. थोड्यावेळाने मुलाचा मृतदेह घरात आढळल्यानंतर त्याने माझ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा कांगावा सुरू केला घटनेची माहिती समजताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळी गाठले. घटनेबद्दल संशय असल्याने पोलिसांनी संतलालला ताब्यात घेत विचारपूस सुरू केली. पोलिसी खाक्या दाखवताच संतलालने आपला गुन्हा कबूल केला आहे.
दुसरी घटना
हत्येची दुसरी घटना काल रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेझनबाग मध्ये घडली.बांधकाम सुरू असताना बांधकाम करणाऱ्या एका मिस्त्री आणि मजुराचा आईची शिवी देण्यावरून वाद झाला. मिस्त्री असलेल्या महादेव सोनूलेने त्याचा सहकारी तिलक चव्हाणच्या डोक्यात लाकडी दांडूने वार करून हत्या केली. आरोपी महादेव सोनूले हे बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतात तर तिलक चव्हाण हा त्यांचा हेल्पर म्हणून काम करायचा. पोलिसांनी तिलक चव्हाणांच्या हत्येप्रकरणी महादेव सोनवलेला अटक केली आहे.
संबंधित बातम्या :