(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Police : अमेरिकन मॉडल हत्या प्रकरण; आरोपीला भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र पोलिस चक्क 'युरोपला' रवाना!
Maharashtra Police : पोलिसांनी निकालाला मुंबई उच्च न्यायलयात आव्हान देत, 19 वर्षांनी हा खटला पुन्हा उभा केला आहे.
Maharashtra Police : आरोपीला भारतात आणण्यासाठी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची टीम चक्क युरोपाला पोहचली आहे. 2003 मध्ये अमेरिकन मॉडलच्या हत्या प्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी हि टीम रवाना झाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते. त्यानंतर पोलिसांनी निकालाला आव्हान देत, 19 वर्षांनी हा खटला पुन्हा उभा केला आहे.
19 वर्षांनी हा खटला पुन्हा उभा
लिओन स्विडेस्की या 33 वर्षीय अमेरिकन मॉडलची 8 फेब्रुवारी 2003 रोजी मुंबई विमानतळावरुन अपहरण करुन, तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत फेकलं होतं. अमेरिकन सरकारने त्यावेळी लिओनाच्या हत्येची गंभीर दखल घेतली होती. आपलं एक पथक मीरा रोडला पाठवलं ही होतं. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी लिओनचा प्रियकर अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल या दोघांना अटक केली होती. तर आणखी दोन आरोपी फरार होते. या खटल्याचा निकाल एका वर्षातच लागला होता. यात दोन्ही आरोपी निर्दोष सुटले होते.
अमेरिकन सरकारची गंभीर दखल, मुंबई उच्च न्यायलयात आव्हान
अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायलयात आव्हान दिलं होतं. न्यायलयात या प्रकरणाची सुनवाणी झाली असताना, दोन्ही आरोपी गैरहजर राहत होते. त्यामुळे खटल्यात प्रगती होत नव्हती. या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त सदानंद दाते यांनी घेवून, तपास जलदगतीने सुरु केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई याला बडोद्यामधून न्यायालयात हजर करण्यात आले. तर विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये असल्याच समजलं. आयुक्त दाते यांनी या प्रकरणाची इंटरपोलची मदत घेतली आणि विपुल पटेलचा शोध लागून, त्याला चेक रिपब्लिक येथील प्राग शहरातील विमानतळावर इंटरपोलच्या मदतीने ताब्यात घेतलं गेलंय.
आरोपीला घेऊन भारतात परतणार
आता मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच एक विशेष पथक शनिवारी प्राग या शहरात गेलं आहे. या पथकात परिमंडल 1 चे पोलिस उपायुक्त अमित काळे, काशिमीरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हजारे, गुन्हे शाखा 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, नवघर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश काळे यांचा समावेश आहे. एका आठवड्यात आरोपीला घेऊन हे पथक भारतात परतणार आहेत.