Nagpur Crime : छेड काढणाऱ्यामुळे किरायाचे घर सोडले, माथेफिरूने केले मुलीच्या वडिलांना केले ठार
शाळेत जात असताना तो सतत मुलीचा पाठलाग करायचा. याबाबत नारायणप्रसाद यांनी त्याला समजविण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही तो तिचा पाठलाग करीत होता. त्यामुळे त्यांनी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.
नागपूरः एक युवक आपल्या मुलीची छेड काढत असल्याने काळजीपोटी वडिलांनी भाड्याचे घर सोडले. याचा रागन मनात ठेवत 20 वर्षीय माथेफिरूने मुलीच्या वडिलांवर भररस्त्यात चाकूने सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. जिवाचा थरकाप उडविणारी ही घटना रविवारी गिट्टीखदान पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
बसराम मनोज पांडे (वय 20, रा. सुरेंद्रगड) असे आरोपीचे तर नारायणप्रसाद दयाप्रसाद द्विवेदी (वय 32 रा. सुरेंद्रगड) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणप्रसाद यांचे रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. सुरेंद्रगड या परिसरात ते आपल्या परिवारासह किरायाने राहतात. त्यांना 15 वर्षांची मुलगी आहे. ते राहत असलेल्या इमारतीमध्ये बलराम मनोज पांडे राहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बलराम त्यांच्या मुलीच्या मागे लागला होता. शाळेत जात असताना सतत तिचा पाठलागही करायचा. ही बाब नारायणप्रसाद यांना कळली. त्यांनी याबाबत त्याला समजविण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही तो तिचा पाठलाग करीत होता. त्यामुळे त्यांनी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला.
पाठलाग करुन केले ठार
एवढेच नव्हे तर घर सोडल्यास खून करण्याचीही धमकी त्या माथेफिरूने नारायणप्रसाद यांना दिली होती. मात्र, त्याला न जुमानता त्यांनी घर सोडले. त्यामुळे बलराम भडकला होता. रविवारी सकाळी नारायणप्रसाद हे आपल्या वाहनावर घरापासून रेल्वेस्टेशनकडे जाण्यास निघाले असताना बलरामने त्यांचा पाठलाग केला. पोलिस स्टेशनच्या काहीच अंतरावर त्यांना थांबवून त्यांचेशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने बलरामने नारायणप्रसाद यांच्या पोटावर आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले आणि पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमी नारायणप्रसाद याला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित बलरामला काही वेळातच अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव
नारायणप्रसाद यांच्या खुनानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असल्याची माहिती आहे. त्यातून गिट्टीखदान पोलिस ठाण्याला परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाइकांनी घेराव घातला. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे कागदपत्रे रुग्णालयाला न मिळाळ्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करता आली नाही. त्यामुळे नागरिकांना मृतहेद अद्याप मिळाला नसल्यानेही नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. बलराम पोलिस ठाण्यात असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप पखाले यांनी पोलिस ठाणे गाठून नागरिकांशी संवाद साधला.