KDMC : कल्याण-डोंबिवली महापालिकेत बंदुका घेऊन फिरायला परवानगी? अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
Kalyan Dombivli : काही लोक शस्त्र घेऊन खुल्याने फिरत असताना अनुचित प्रकार घडल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या सुरक्षा उपायुक्तांनाही त्यासंबंधित नियमांची माहिती नाही.

ठाणे : नेहमीच काही ना काही घटनेमुळे चर्चेत राहणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिका आताही वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. महापालिकेच्या आवारात काही खासगी लोक शस्त्रास्त्र घेऊन खुलेपणाने फिरत असल्याचं दिसून आलं. तर यावर नियम काय आहेत याची माहिती महापालिकेच्या सुरक्षा उपायुक्तांना नसल्याचं दिसून आलं. केडीएमसी सुरक्षा रक्षकांवर लाखो रुपयांचा खर्च करूनही ती कुचकामी ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
काही महिन्यापूर्वी कल्याण न्यायालयात खासगी अंगरक्षक बंदूक घेऊन फिरत असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर पोलीस उपायुक्तांनी 11 पोलिसांना निलंबित केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली महापालिकेत भर दिवसा बंदूकधारी फिरत असल्याचं दिसून आलं.
नागरिकांसमोर खुलेपणाने वावर
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयात खासदार श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या आजी माजी पदाधिकारी, नगरसेवकांचे खासगी अंगरक्षक महापालिका दालनात नागरिकांसमोर बंदुका घेऊन फिरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
बंदुका या अंगरक्षकांना कोणाचीही भीती नसल्याचे दिसून आले. महापालिकेने सुरक्षा विभागावर लाखो रुपये खर्च केले असून महाराष्ट्र सुरक्षा बलाचे शेकडो जवान कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत.
उपायुक्तांना नियम माहितीच नाहीत
धक्कादायक म्हणजे खासगी अंगरक्षक अथवा लायसन्स धारी पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी सुरक्षा विभागात अग्निशस्त्र जमा करण्यासाठीचे फलक लावले आहेत. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका सुरक्षा उपायुक्त वंदना गुळवे यांना याची माहितीच नाही. त्यावर बेजबाबदार उत्तर देणाऱ्या सुरक्षा रक्षक उपायुक्तांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. एखादी घटना घडली तर याची जबाबदारी आयुक्त घेणार का असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.
महापालिकेतील या प्रकारावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काही लोक शस्त्र घेऊन आले होते. जणू काही ते लढायला चालले आहेत अशा आवेशात वागत होते. महापालिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र आणण्यास बंदी असताना काही लोक शस्त्रधारी बॉडीगार्ड घेऊन महापालिकेच्या आवारात दिसून आले. या घटनेवरती जेवढा खेद व्यक्त करावा तेवढा कमी आहे. यांना भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवली पाहिजे अशी माझी विनंती आहे."
ही बातमी वाचा:























